रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. शेअर बाजारातील पडझड आणि सोनं चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. असं असताना युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफवाचं पेव देखील फुटलं आहे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं दिसत आहे. यासाठी फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांनी पुढाकार घेत मोठं पाऊल उचललं आहे. कटेंट आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर कारवाई केली जात आहे. रशिया युक्रेन युद्धाशी निगडीत आणि द्वेष पसरवणाऱ्या कटेंटवर कारवाई करण्यात येत आहे. तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार यासाठी पावलं उचलली जात आहेत. तसेच, फेसबुकने एक फीचर लाँच केले आहे, जेणेकरुन यूजर्स त्यांचे प्रोफाईल पिक्चर लॉक करू शकतील. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तर, युक्रेनमधील ट्विटर वापरकर्त्यांना देखील सूचित केले गेले की ते त्यांचे ट्विटर खाते हॅकिंगपासून कसे सुरक्षित ठेवू शकतात. ट्विटरने युजर्सना त्यांचे अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करण्यासोबतच त्यांचे ट्विटर प्रायव्हेट करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी ट्विटरने इंग्रजी, रशियन आणि युक्रेनियन भाषेत ट्विट करून माहिती दिली आहे.
Twitter Inc. ने सांगितले की, “रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या जाहिराती निलंबित केल्या आहेत. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. दिशाभूल करणार्या आणि अपमानास्पद सामग्रीचा प्रसार रोखण्यावर भर आहे. युजर्सच्या टाइमलाइनमध्ये दिसणाऱ्या ट्विटवर शिफारशीनंतर अंकुश ठेवला जाईल. ट्विटर नियमांचे उल्लंघन करणार्या पोस्टवर देखरेख ठेवून आहे.”
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर फेसबुकच्या सुरक्षा धोरणाचे प्रमुख नॅथॅनियल ग्लेचर यांनी सांगितले की, “आम्ही आता रशियन राज्य माध्यमांना जगभरात कुठेही आमच्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती किंवा कमाई करण्यापासून प्रतिबंधित करत आहोत. आम्ही अतिरिक्त रशियन राज्य माध्यमांना लेबल लागू करणे सुरू केलं आहे.”
दुसरीकडे, युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाने फेसबुकवर अंशत: बंदी घातली आहे. फेसबुकने क्रेमलिन समर्थित अनेक माध्यमांच्या खात्यांवर बंदी घातल्यानंतर रशियाने हे पाऊल उचलले आहे. फेसबुकला RIA नोवोस्ती, राज्य टीव्ही चॅनेल झ्वेझदा आणि प्रो-क्रेमलिन न्यूज साइट्स Lenta.Ru आणि Gazeta.Ru वरील निर्बंध उठवण्याचे आवाहन केले आहे, असं रशियन वॉचडॉग Roskomnadzor या संस्थेनं सांगितलं आहे.