पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंधन दरवाढ होईल अशी शक्यता आहे. कारण रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीतून काढून टाकले आहे. यामुळे रशियाला इतर देशांसोबत व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे निवडणुकांचा निकाल जाहीर होताच इंधन १५ ते २० रुपयांनी वाढेल अशी चर्चा सुरु आहे. भारताची इंधनाची गरज भागवण्यासाठी जवळपास ८४ टक्के खनिज तेल आपण आयात करतो. भारत रशियाच्या सर्वात मोठ्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी रोसनेफ्टकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर आले होते. तेव्हा रोझनेफ्ट आणि इंडिया ऑइल कॉर्पोरेशनने २०२२ च्या अखेरीस नोव्होरोसियस्क बंदरातून भारताला २० दशलक्ष टन तेल पुरवठा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. भारत तेलखरेदीसाठी मध्यपूर्वेकडील देशांवर अवलंबून आहे. आयातीत वैविध्य आणण्यासाठी अमेरिका आणि रशियासारख्या देशांकडून तेल खरेदी वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशांतर्गत पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाक इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या भावाशी निगडित असतात. त्यामुळे येत्या दिवसात सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागून आहे. असं असताना निर्बंधांमुळे अडचणीत आलेल्या रशियन तेल कंपन्या भारताला तेलावर भरघोस सूट देत आहेत. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, रशियन तेल कंपन्या भारताला क्रूडच्या किमतीवर २५ ते २७ टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत. जर हा प्रस्ताव भारताने स्वीकारला तर पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा