पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन देशांचा दौरा करुन भारतात परतले आहे. दिल्लीच्या पालम विमानतळावर भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. या वेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या दौऱ्यावर जाणं हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण होता. आज भारताकडे जग ज्या दृष्टीकोनातून पाहतो आहे त्याची व्याप्ती मला समजली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची ही ताकद आहे असंही ते म्हणाले. तसंच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख Boss असा का केला? याचाही किस्सा सांगितला.
काय म्हणाले एस जयशंकर?
“मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तीन देशांच्या दौऱ्यावर गेलो होतो. मी या दौऱ्यातला एक अनुभव सांगू इच्छितो. आम्ही जेव्हा सिडनीमध्ये गेलो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान द बॉस असं म्हणाले. हा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला, पण तो त्यांच्या भाषणाचा भाग नव्हता. द बॉस हे शब्द त्यांच्या ओठांवर आपोआप आले. मोदींचा उल्लेख द बॉस असा करणं ही माझ्या मनातली भावना आहे असं त्यांनीच कार्यक्रमानंतर मोदींना सांगितलं होतं. मोदींशी बोलताना ते म्हणाले की तुम्हाला द बॉस म्हणणं हे काही कागदावर लिहिलेलं नव्हतं. ते माझ्या मनातून आलं होतं. “
आणखी काय म्हणाले एस जयशंकर?
एस जयशंकर पुढे म्हणाले की आम्ही जेव्हा पापुआ न्यू गिनी या देशात गेलो तेव्हा तिथल्या पंतप्रधानांनी अत्यंत उत्साहाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर विश्वगुरु आहेत असाही उल्लेख त्यांनी केल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. जर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींना द बॉस म्हणतात, पापुआ गिनीचे पंतप्रधान मोदींना विश्वगुरु मानतात तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की भारताकडे जग ज्या नजरेने पाहतं आहे त्याचं कारण फक्त नरेंद्र मोदी आहेत. आम्ही विविध बैठका केल्या, जगाला हे जाणून घ्यायचं आहे की मोदी सरकारने करोनाचा मुकाबला कसा केला? कमी वेळात लस कशी तयार केली? असंही एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.