Sachin Tendulkar News: सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो आणि देव कधीच खोटं बोलत नाही असं म्हणतात. सचिनने सुद्धा एका बड्या जाहिरातीला नाकारून आपलं क्रिकेटवरील प्रेम सिद्ध केलं आहे. याबाबत अलीकडेच इन्फोसिसच्या एका कार्यक्रमात बोलताना सचिनने मोठा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकरच्या करिअरची सुरवातच धमाकेदार झाली होती. आजवर टेस्ट, वन डे मध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. जेव्हा तेंडुलकरने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हाच त्याच्या बॅटिंगची शैली बघून हा मोठ्या खेळीचा खेळाडू आहे असे सगळ्यांचं लक्षात आले होते. १९८८ मध्ये शारजाहमध्ये सचिनने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध एक दिवसीय सामन्यात १३१ बॉलमध्ये १४३ धावा करत सर्वांना थक्क केले होते.
सचिनचा हा खेळ पाहून या डावाला ‘डेझर्ट स्टॉर्म इन शारजाह’ असे टोपणनाव देण्यात आले होते. या सामन्यामुळेच जागतिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा दर्जा वाढला. याच शारजाह दौर्यानंतर सचिनला एका जाहिरातीची ऑफर आली होती. सहसा क्रिकेटर्स अशा संधी सोडत नाहीत पण ही जाहिरात सचिनच्या प्रेमाचा म्हणजेच क्रिकेटचा अपमान करत असल्याचे म्हणत त्यानेही जाहिरात नाकारली होती.
सचिनने का नाकारली जाहिरात..
सचिनने सांगितले की, “१९८८ मध्ये शारजाहमधील सामन्यांनंतर एका जाहिरातीची ऑफर आली होती. ही जाहिरात अशी होती की, जिथे क्रिकेटचा बॉल माझ्याकडे येतो आणि मी तो चेंडू बॅटने मारताच तो स्टेडियमच्या बाहेर जातो. ही आयडिया ऐकताच मी जाहिरात नाकारली, मी म्हणालो की तुम्हाला स्क्रिप्ट बदलावी लागेल कारण यामुळे माझ्या खेळाचा अनादर होत आहे आणि मी माझ्या खेळाची पूजा करतो. मी या जाहिरातीचे चित्रीकरण करणार नाही. सुदैवाने त्यांनी स्क्रिप्ट बदलली.”
सचिन म्हणाला की अशी जाहिरात शूट केल्यानंतर मी कदाचित घरी किंवा प्रशिक्षकाकडे पुन्हा जाऊ शकलो नसतो. त्यांनी मला शिकवलं आहे, माझ्यात काही मूल्य रुजवली होती. आणि मी आयुष्यभर त्या मूल्यांचा सन्मान ठेवेन.
हे ही वाचा<< Video: सचिन तेंडुलकरचा रोमँटिक अंदाज झाला Viral; हॉटेलमध्येच असं काही केलं की अंजली लाजून..
दरम्यान, २४ वर्षांच्या कारकिर्दीत, तेंडुलकरने २०९ कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच T20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने २०१३ मध्ये खेळाच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. ऑक्टोबर २०२२ मध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये त्याचा शेवटचा क्रिकेट खेळला होता, जिथे त्याने श्रीलंका लीजेंड्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या लीजेंड्स संघाचे नेतृत्व केले होते.