दिवाळी म्हटली की दिव्यांची रोषणाई, घराला लावले जाणारे आकाशकंदील आणि दिव्यांच्या माळा, नवनवीन कपडे घालून सजणे हे आलेच. पण एका ठिकाणी चक्क रेड्याला सजवून त्याची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. यामध्ये या रेड्याची शिंगे रंगवण्यात आली आहेत. त्याला गळ्यात माळा आणि इतरही काही दागिने घालण्यात आले आहेत. हैद्राबादमध्ये अशाप्रकारे दिवाळी विशेष पद्धतीने साजरी केली जाते. येत्या ९ नोव्हेंबर रोजी हा आगळावेगळा सोहळा पार पडणार असून दरवर्षी यादव समाजाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी हा सोहळा याच दिवशी साजरा केला जातो. ही पारंपरिक प्रथा असून त्याला या समाजात विशेष महत्त्व आहे.

अतिशय उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाला सदर नावाने ओळखले जाते. यावेळी सजवलेल्या या रेड्याची गावातून मिरवणूकही काढण्यात येते. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती अतिशय आनंदाने सहभागी होतात. यातील काळ्या रंगाचा हा रेडा अतिशय देखणा दिसत असून त्याला लावलेली लाल रंगाची वेसणही उठून दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटव्दारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एकाठिकाणी दोन रेडे पाणी पित असल्याचे दिसत आहे. तर आणखी एका फोटोत ते आपल्या मालकासोबत असल्याचे दिसत आहे.