रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये भारताला कांस्य पदक जिंकून देणारी साक्षी मलिक हिला खूप दिवसांनी तिच्या आवडीचे पदार्थ खाण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचा एक फोटो साक्षीने सोशल मिडीयावर शेअर केला. रिओची तयारी सुरु करण्यापूर्वी साक्षी ब्रेकफास्टमध्ये काय खायाची त्याचा फोटो तिने टाकला आहे. प्रत्येक खेळाडूला एका मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी विशिष्ट आहाराचे सेवन करावे लागते. यात त्यांना आपल्या आवडींना मुरड घालून विशिष्ट डायट फॉलो करावे लागते. या डायटमध्ये त्या खेळाडूला आवडत नसलेले पदार्थ खावे लागतात. तसेच आवडत असलेले काही पदार्थ वर्ज्यही करावे लागतात. साक्षीने शेअर केलेल्या फोटोत ती ब्रेकफास्ट करताना दिसते. यास तिने एक परिपूर्ण ब्रेकफास्ट.. असे कॅप्शनही दिले आहे.
कुस्तीमध्ये पदक जिंकल्यानंतर एका मुलाखतीत २३ वर्षीय साक्षी म्हणाली होती की, मला आलू पराठाची खूप आठवण येत होती. पण ते मी खाऊ शकत नव्हते. ब-याच वर्षांपासून मी आलू पराठा आणि कढी चावल खाल्लेलं नाही असं मला वाटतंय. मी केवळ हलका आहार घेऊ शकत होते. पण आता मी काहीही खाऊ शकते आणि मला कोणीच रोखणार नाही.
A proper breakfast! How I have missed you! 😂😂 pic.twitter.com/UtSmF0gFQ5
— Sakshi Malik (@SakshiMalik) August 22, 2016
साक्षी मलिकव्यतिरीक्त रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी वी सिंधू हिलाही डायट चार्ट फॉलो करावा लागला होता. सिंधूला आइस्क्रिम, गोड दही आणि याव्यतिरीक्त काही पदार्थ खाणे वर्ज्य करण्यात आल्याचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले होते. साक्षीच्या आधी ऑस्ट्रेलियाचा बॅडमिंटनपटू सावन यानेदेखील एक फोटो शेयर केला होता. त्यात तो मॅक डॉनल्डमध्ये खूप सारे पदार्थ खाताना दिसत होता.