गेल्या काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी आधी महात्मा गांधी आणि नंतर महात्मा फुलेंविषयी केलेली वक्तव्य वादात सापडली आहेत. या विधानांमुळे संभाजी भिडेंवर कारवाई केली जावी, त्यांना अटक केली जावी अशी मागणीही केली जात आहे. यासंदर्भात खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे संभाजी भिडे टीकेच्या केंद्रस्थानी असताना दुसरीकडे त्यांच्या नावाने एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. नेमकी खरी पोस्ट काय आहे? याचा हा आढावा.

काय आहे संभाजी भिडेंसंदर्भातली व्हायरल पोस्ट?

संभाजी भिडे यांच्या नावाने सध्या एक विधान व्हायरल केलं जात आहे. लोकसत्ता डॉट कॉमच्या क्रिएटिव्ह इमेजवर संभाजी भिडेंचं हे विधान लावून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात संभाजी भिडे स्वत:बाबत बोलल्याचा दावा करण्यात आला आहे. “माझी आई म्हणायची की मी मुसलमानाची अवलाद आहे आणि बाप म्हणायचा की मी गँग-रेपची पैदास आहे”, असं संभाजी भिडे म्हणाल्याचा दावा यात करण्यात आला आहे. मात्र, ही पोस्ट व हे विधान खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

sambhaji bhide statement controversy
संभाजी भिडेंच्या नावाने व्हायरल होत असलेली खोटी पोस्ट!

नेमकं सत्य काय?

वास्तविक ही मूळ पोस्ट लोकसत्ता डॉट कॉमच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. यातील विधानही बदलून ते व्हायरल केलं जात आहे. “पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रुपाने जन्माला येतो. तसेच, एखादी महिला आपल्या मुलीच्या रुपाने स्वत: जन्म घेत असते”, असं संभाजी भिडे यांचं खरं विधान असून खालील फोटोमध्ये ते स्पष्टपणे दिसून येत आहे.

Sambhaji bhide statement controversy
संभाजी भिडे यांच्या विधानाची खरी पोस्ट! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता डॉट कॉमच्या अधिकृत फेसबुक पेजवर २७ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती.

संभाजी भिडेंनी हे विधान कुठे व कधी केलं?

पती-पत्नीसंदर्भातील मूळ विधान संभाजी भिडे २७ जुलै रोजी नागपूरमधील एका कार्यक्रमात केलं. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या नागपूर विभागाने सुभाष रोड, गीता मंदिर येथील कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी पुनर्जन्माबाबत हे भाष्य केलं आहे.

Story img Loader