डान्सर गौतमी पाटीलचा नाच आणि तिच्या कार्यक्रमांवरुन होणारे वाद हे काही नवे नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून काही ना काही प्रकार समोर येत आहेतच. अशातच गौतमीच्या आडनावावरुन वाद झाला आहे. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली होती. यानंतर संभाजीराजेंनी डान्स आणि आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. महिला संरक्षणाचा मुद्दा संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.
काय म्हटलं आहे संभाजीराजेंनी?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळेच महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालंच पाहिजे मी याच मताचा आहे असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. इतर राज्यांमध्ये जातीवर राजकारण चालतं. जाती विषमता कमी करायची असेल तर बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाला लोक कंटाळले आहेत. खोके-बोके, मांजर-कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा? याविषयीची अपेक्षा लोक करत आहेत.
काय आहे गौतमीच्या आडनावाचा वाद?
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर टीका होताना दिसत आहे. सातत्याने तिच्या नृत्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या संघटना टीका करत असताना आता मराठा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रत होऊ न देण्याचा जाहीर इशारा दिला आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही. मराठ्यांचं पाटील हे नाव खराब करण्याचं तिचं षडयंत्र आहे”, अशी भूमिका राजेंद्र जराड पाटील यांनी मांडली.
गौतमी पाटीलने काय म्हटलं आहे?
मी कार्यक्रमात कुणाचाही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम चांगला पार पडतो. मला कुणी नावं ठेवली तरीही फरक पडत नाही. माझं आडनाव पाटील आहे आणि पाटीलच लावणार असं म्हणत गौतमीने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.