एस.एस. राजामौलींच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाबद्दल काय आणि किती बोलावं असाच प्रश्न आता अनेकांना पडतो आहे. ‘माहिष्मती साम्राज्य’, ‘भल्लालदेव’, ‘बाहुबली’ आणि इतर पात्रांच्या बळावर राजामौलींनी या भव्य चित्रपटाचा घाट घातला आणि तो यशस्वीपणे प्रेक्षकांसमोर सादर केला. आजही ‘बाहुबली २’ हा चित्रपट प्रत्येक भारतीयाच्या मनावर आजही राज्य करत आहे. या चित्रपटातील बहुतेक दृश्ये अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची तुलना ‘बाहुबली २’ च्या एका दृश्याशी केली जात आहे. तुम्हाला ‘बाहुबली २’ चित्रपटातील दक्षिण भारतीय सुपरस्टार प्रभासचा एक सीन आठवत असेल, ज्यामध्ये तो हत्तीला नियंत्रित करून त्याच्या सोंडेवर उभा असल्याचे दिसले होते. चित्रपटातील हा सीन खूप गाजला होता. यानंतर आता सोशल मीडियावर एक माहुत देखील सुपरस्टार प्रभासच्या स्टाईलमध्ये हत्तीच्या पाठीवर चढताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेली क्लिप आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘बाहुबली २’ चित्रपटातील सुपरस्टार प्रभासप्रमाणे या व्यक्तीनेही हे केले. तसेच आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या पोस्टमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली आणि बाहुबली चित्रपटाला टॅग केले आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच त्याखाली मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत.