दिगंबर शिंदे, प्रतिनिधी
Leave Application for Gautami Patil: आपल्या गावात गौतमी पाटील येणार आहे त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी मंजूर करावी असा रजेचा अर्ज एका एसटी चालकाने दिल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सांगलीतल्या तासगाव डेपो या ठिकाणी काम करणाऱ्या चालकाने हे पत्र लिहिल्याचं या पत्रावरुन दिसतं आहे. या चालकाने खरंच हा अर्ज केला होता का? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र लोकसत्ता ऑनलाईनने याची शहानिशा केली. या चालकाने खरोखरच हा अर्ज केला होता. मात्र तो महामंडळाकडून स्वीकारला गेलाच नाही. तसंच राजीनाम्याचं हे पत्र व्हायरल झाल्यानंतर चालकाने आपण हा अर्ज केलाच नाही असं म्हणत कानावर हात ठेवले आहेत.
काय म्हटलं आहे या व्हायरल पत्रात?
जो रजेचा अर्ज व्हायरल होतो आहे त्यामध्ये एस.टी. बस चालकाने २२ आणि २३ मे या दोन दिवशी गावात गौतमी पाटील येणार म्हणून रजा मागितली आहे. गावात गौतमी पाटील येणार तेव्हा रजा मिळावी असा मजकूर या अर्जात स्पष्ट दिसतो आहे. सोशल मीडियावर हा अर्ज व्हायरल झाला आहे. सांगीलच्या एसटी प्रशासनात या अर्जाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर हा रजेचा अर्ज व्हायरल झाला आहे त्यामुळे या अर्जाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
या चालकाचं गाव यमगरवाडी असं आहे. वायफळे गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम एका लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. त्याच कार्यक्रमाला जाण्यासाठी या चालकाने रजेचा अर्ज केला होता. मात्र रजेचा अर्ज स्वीकारलाच गेला नाही. तसंच हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा अर्ज आपण केलाच नव्हता असं या चालकाने आता म्हटलं आहे.
गौतमी पाटील आणि तिच्या लावणीचा कार्यक्रम गावात असला की ती गावकऱ्यांसाठी पर्वणीच असते. तिला पाहण्यासाठीच लोक प्रचंड गर्दी करत असतात. अशात आता गौतमी पाटील गावात येणार म्हणून एका बस चालकाने चक्क दोन दिवसांची रजा मिळावी म्हणून अर्ज केला आहे. हा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम तासगाव तालुक्यातल्या वायफळे या ठिकाणी २१ मे रोजी होणार आहे त्याआधीच हा रजेचा अर्ज व्हायरल झाला आहे.
गौतमी पाटील ही काही ना कारणाने कायमच चर्चेत असते. दोन दिवसांपूर्वीच संभाजी नगरमधल्या वैजापूर या ठिकाणी तिचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला लोकांनी खच्चून गर्दी केली होती. काही लोक तर पत्र्याच्या शेडवरही बसले होते. या पत्र्याच्या शेडवर लोकांचं इतकं वजन झालं की ती शेड कोसळून या कार्यक्रमात अपघातही झाला. चाहत्यांमध्ये गौतमी पाटीलची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे तिची चर्चा वेगवेगळ्या कारणांनी होत असते. आता या व्हायरल रजेच्या अर्जामुळे गौतमी पुन्हा चर्चेत आली आहे.