Sarvajanik Mandal pati viral: बुद्धीची देवता, सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे घराघरांत वाजत-गाजत स्वागत झाले आहे. गणेश चतुर्थीचा उत्साह फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच असून सर्वच गणरायाच्या सेवेसाठी भक्त सज्ज झाले आहेत. सार्वजनिक मंडळांमध्येही बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेकदा मंडळातील गणपती बाप्पाची मूर्ती आकर्षक असते, तसेच त्यांची सजावटही वेगळी आणि आकर्षित असते त्यामुळे भक्त मंडळाचे गणपती पाहण्यासाठी गर्दी करतात.
अशावेळी मंडळांडून वेगवेगळ्या सूचना मंडपाबाहेर लावलेल्या पाहायला मिळतात. अनेकदा या सूचना पाटीवर लिहून ही पाटी बाहेर लावली जाते. कधी शिस्तीसंदर्भात या सूचना असतात तर कधी नियम असतात. मात्र सध्या एका मंडळाने लावलेली अशी एक पाटी व्हायरल होत आहे, जी पाहून सर्वच संतापले आहेत. या मंडळाने लावलेल्या पाटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण ही पाटी गणेशोत्सवानिमित्त नाही तर श्रावणी सोमवारनिमित्त लावली होती, पण अनेकजण या पाटीचा संदर्भ गणेशोत्सवाशी जोडून व्हायरल करत आहेत. त्यामुळे ही पाटी पाहून तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं.
खरं तर हा बॅनर कुठल्याशा सार्वजनिक मंडळानं लावला आहे. पण त्यावर प्रसादाबाबत लिहिलेल्या मजकूरावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. लोक म्हणताहेत, ‘जर झेपत नसेल तर गणपती घरात बसवा.’ आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असं लिहिलंय तरी काय या पाटीवर? तर या पाटीवर “श्रावणी सोमवार महाप्रसाद फक्त भरत मित्र मंडळाच्या सभासदांसाठीच आहे. त्यामुळे हॉस्टेलच्या मुला-मुलींनी किंवा इतर नागरिकांनी प्रसाद घेण्यासाठी थांबू नये ही नम्र विनंती.” असा मजकूर लिहिला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> धक्कादायक! विमान हवेत जाताच लोक बेशुद्ध झाले; इंडिगोच्या विमानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
नेटकऱ्यांचा संताप
सोशल मीडियावर हा फोटो viralinmaharashtra नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी संताप व्यक्त करत टीका करत आहेत. अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया या फोटोवर दिल्या आहेत. एकानं म्हटलंय, “कोणी सांगेल का हे मंडळ कोठे आहे ?”, तर दुसरा एक जण म्हणतो, “मग वर्गणी पण फक्त सभासदांकडूनच घ्यायची” तर आणखी एका युजरने “महाप्रसादाचा अर्थ काय असतो तो, या मंडळाने जाणून घायला हवं…” अशी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर, “मनी नाही भाव अन देवा मला पाव” असे टोमणे देखील मारले आहेत.