Shocking video: कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठीत बोलण्यास नकार देत मराठी तरुणाशी उद्धट वर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. या प्रकरणी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता एअरटेल प्रशासन आणि संबंधित महिला कर्मचारीने या प्रकारावर माफी मागितली आहे. दरम्यान आता एका बँकेत तेथील कर्मचारी मराठी बोलणाऱ्या वृद्धांसोबत गैरवर्तणूक करत असल्याचे आरोप केले जात आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे ही बँक साताऱ्यात आहे. पण तरी देखील या बँकेतील कर्मचाऱ्यांना मराठी बोलता येत नाही. उलट ही मंडळी ग्राहकांनाच हिंदी शिकायला सांगताहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.
ही बँक साताऱ्यात पाटना तालुक्यात आहे. या व्हिडीओमध्ये झळकणाऱ्या तरुणानं केलेल्या आरोपानुसार या बँकेत बहुतांश खाती ही वृद्ध मंडळींची आहेत. या वृद्धांना हिंदी बोलता येत नाही. त्यांना फक्त मराठी भाषा कळते. पण बँकेतील कर्मचारी त्यांना हिंदीमध्येच बोलण्याचा अट्टहास करत आहेत. कारण त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. पुढे या तरुणानं केेलेल्या दाव्यानुसार, जेव्हा या प्रकरणी त्यांचाकडे जाब मागितला तेव्हा त्यांनी जा हिंदी शिकून या आम्हाला तुमची गरज नाही असं उलट उत्तर त्यांनी दिलं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला सांगत आहे की आम्हाला काही कळत नाही तर यांनी समजावून सांगितलं पाहिजे पण हे तसं करत नाहीत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ekikaranmarathi या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. एकानं म्हंटलंय “ग्रामीण भागात पण हे विना मराठी कसे राहतात म्हणजे आपले माणसेच यांच्याशी हिंदी बोलत असणार.” दुसरा म्हणतो, “बँकेला मराठी माणसे मिळाली नाहीत का बँक कामासाठी अशी खूप बेरोजगार आहेत त्यांना का दिली नाही नोकरी ही भरती मराठी माणसाला डावलून कशी झाली ह्याची चौकशी केली पाहिजे” आणखी एकानं, “महाराष्ट्र हे नाव या बँकेच्या नावात फक्त नावालाच आहे, बाकी सगळ्या पाट्या सुचना या हिंदी मध्ये असतात या बँकेच्या.” तर आणखी एकानं, “पैसा महाराष्ट्राचा, जमीन महाराष्ट्राची, बँक महाराष्ट्राची आणि गुणगान हिंदीच..आता नाही चालणार..” अशी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.