सबसे कातील गौतमी पाटील ही ओळख असलेली नृत्यांगना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. मात्र आता तिला एका बैलाच्या वाढदिवसाला प्रमुख पाहुणी म्हणून निमंत्रण देण्यात आलं. हे निमंत्रण गौतमीने स्वीकारलं. तिने स्वतः पोस्ट करत ही माहिती दिली. साताऱ्यात एका पैलवानाने आपल्या लाडक्या बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटीलला निमंत्रण दिलं. तिने या वाढदिवस कार्यक्रमात लावणी सादर करावी असं या पैलवानाने सांगितलं जे निमंत्रण गौतमी पाटीलने स्वीकारलं आणि ती कार्यक्रमाला उपस्थित होती.
बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटील सायंकाळी सात वाजता उपस्थित राहिली होती. सातारा जावळीतील खर्शी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडा मालक आणि पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सतीश भोसले यांनी हे आयोजन केलं.आश्विन नावाचा बैल हा महाराष्ट्र चॅम्पियन असून त्याच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं. गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
गौतमी पाटील तिच्या हावभावांमुळे अनेकदा सापडली आहे वादात
गौतमी पाटील ही तिच्या डान्समुळे अनेदा वादात सापडली आहे. त्यावरून तिने अनेकदा माफीही मागितली आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. उलट तिच्या कार्यक्रमांना मागणी वाढत गेली. आणि गौतमी पाटील अधिकच प्रसिद्ध होते आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या बाबीची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली होती.
कोण आहे गौतमी पाटील?
गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. १० वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले. पहिल्यांदा लावणी केल्यावर गौतमीला ५०० रुपये मानधन मिळाले होते. गौतमी सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिचे रिल्स कायम चर्चेत असतात.
मराठी चित्रपटात झळकणार
काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असेही आवाहन तिने केले आहे.