इंडोनेशियात आलेल्या शक्तीशाली भूकंपानंतर उसळलेल्या त्सुनामी लाटांनी आतापर्यंत १ हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. सुलवेसी बेटावरील लोकांना या घटनेनंतर अन्न-पाणी मिळेनासे झाले. शुक्रवारी इंडोनेशीयात ७.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला . दरम्यान भूकंप येण्यापूर्वी आणि आल्यानंतर उपग्रहाद्वारे इंडोनेशियाचे जे छायाचित्र टिपण्यात आले होते सध्या व्हायरल होत आहे.
उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या इंडोनेशीयाच्या छायाचित्रामुळे प्रयलायाची भीषणता दिसून येत आहेत. भूकंप आणि तत्सुनामीनंतर या ठिकाणची अर्ध्यांहून घरं वाहून गेली आहेत. तर काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहे. अंगावर काटा आणणारं हे दृश्य भूकंप आणि त्सुनामीची भीषणता जगाला दाखवत आहे. या नैसर्गिक आपत्तीनं इंडोनेशियातील पालू या छोट्या शहराचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. आतापर्यंत भूकंप आणि त्सुनामीनं १ हजार २३४ लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यात पालू शहरातील मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.
उपग्रहाद्वारे टिपलेले हे छायाचित्र पालू शहराचे आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी तसंच मलब्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचावकार्य अद्याप सुरु आहे. दरम्यान, परिस्थिती गंभीर झाली असून इंडोनेशियात गरजेच्या वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. औषधं तसंच खाण्या पिण्याच्या गोष्टींची कमतरता भासू लागल्याने प्रचंड हाल होऊ लागले आहेत. इंडोनेशियाने इतर देशांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.