सौदी अरेबियातील मदिना या पवित्र शहरात सोने चांदीचे नवीन साठे सापडले आहेत. एका ट्विटर पोस्टमध्ये सौदी जिओलॉजिकल सर्व्हेने माहिती दिली आहे की मदिना क्षेत्रातील आबा अल-राहा प्रदेशाच्या सीमेवर सोन्याच्या धातूचे साठे सापडले आहेत. नवीन सोन्याचा साठा उपलब्ध झाल्यामुळे देशातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार अधिक आकर्षित होतील, ज्यामुळे खाण क्षेत्रात अधिक गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे.
सौदी अरेबियात(saudi arabia) नव्याने सापडलेल्या सोने आणि तांबे धातूच्या साठ्यांमुळे सुमारे ५३३ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित होईल आणि सुमारे ४,००० नवीन रोजगार निर्माण होतील अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. सौदी अरेबियामध्ये सुमारे ५३०० खनिज साठे आहेत. त्यात अनेक प्रकारची खनिजे आढळतात.
( हे ही वाचा: राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डेव्हिड बेकहॅम तब्बल १२-१३ तास सामान्य लोकांच्या रांगेत; Video झाला व्हायरल)
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी खाणकामाच्या विस्ताराला त्यांच्या व्हिजन २०३० चा एक महत्त्वाचा भाग म्हणून वर्णन केले आहे. या वर्षी मे मध्ये, सौदी अरेबियाच्या उद्योग आणि खनिज संसाधन मंत्रालयाने खाण क्षेत्रात ३२ डॉलर अब्ज गुंतवणूक आकर्षित करण्याची योजना आखली होती.
सौदी अरेबिया सोन्याचा सर्वात मोठा धारक म्हणून जगात १८ व्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत सोने आणि तांब्याचे नवीन साठे मिळणे सौदी सरकारला भविष्यात लाभदायक ठरणार आहे. यामुळे केवळ स्थानिकच नाही तर इतर देशांतील गुंतवणूकदारही आकर्षित होणार आणि आगामी काळात चांगली गुंतवणूक दिसून येण्याची शक्यता आहे.