महिलांसाठी घालून दिलेला सौदी अरेबियातला महत्त्वाचा नियम मोडण्याचं धाडस एका तरूणीने केलं. मिनी स्कर्ट घाल्यानंतर कोणत्याही सामान्य मुलीची एवढी चर्चा झाली नसेल तेवढी त्या तरूणीची झाली. त्याला कारणही तसंच होतं म्हणा, सौदी अरेबिया सारख्या देशात तोकडे कपडे घालून फिरणं म्हणजे भयंकर गुन्ह्यापेक्षा कमी नाही. पण तिने हा गुन्हा केला. त्यातून अशा कपड्यातले फोटो चुकूनही सोशल मीडियावर अपलोड करण्याची चूक कोणतीही सौदी महिला करणार नाही, पण तिने तेदेखील केलं. तिचं पुढे काय होईल याची सगळ्यांना भीती होतीच. पण ती तरूणी कोण होती हे मात्र कोणालच ठावूक नव्हतं म्हणूनच ती सुरक्षित होती. पण आता मात्र तिचा शोध लागला असून पोलिसांनी तिला ताब्यातही घेतलं आहे. तोकडे कपडे घालण्याच्या अक्षम्य गुन्ह्यासाठी तिला तुरुंगवास होईल त्याचप्रमाणे चाबकाच्या फटक्यांची शिक्षा होणार अशीही चर्चा आहे.
‘खुलूद’ या नावाने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सौदीच्या राजधानीपासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या एका प्राचीन किल्ल्यावर ती क्रॉप टॉप आणि तोकडे स्कर्ट घालून मुक्तपणे फिरत होती. हा व्हिडिओ पाहून सौदीमध्ये मोठं वादळ उठलं होतं. तिला पकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. यासाठी सौदीमधल्या काही कट्टरावाद्यांनी नैतिक पोलिसांना पत्रही पाठवलं होतं. या पत्रात तिला लवकरात लवकर पकडून चाबकाचे फटके देण्यात यावेत अशी मागणी केली होती. पण तिचं खरं नाव काय, ती नेमकी कुठे राहाणारी होती हे कोणालाचं कळलं नव्हतं. मात्र आता सौदीमधल्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिला अटक करण्यात आलीय. पोलीस तिची चौकशी करत आहे. हा व्हिडिओ आपण अपलोड केला नसून कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने हा व्हिडिओ अपलोड केल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारचे कपडे घालून आपण एकटीच फिरत नसल्याचेही तिने म्हटले आहे. माझ्यासोबत माझा जोडीदार होता असंही तिने पोलिसांना आपल्या चौकशीत सांगितले.
सौदीमध्ये हिजाब, आयबा परिधान करण्याची महिलांना सक्ती आहे. हे नियम मोडणाऱ्या महिलेला शिक्षा दिली जाते अनेकींना तर यापूर्वीही तुरूंगवासाठी किंवा चाबकाचे फटके खाण्याची शिक्षा मिळाली आहे. या शिक्षेतून त्यांची सुटका होणं जवळपास अशक्यच आहे तेव्हा तिलाही नियमाप्रमाणे शिक्षा करण्यात येईल.