सौदी राजांचे थाट आणि शौक काही विचारायला नको. पाण्यासारखा पैसा आणि श्रीमंती त्यांच्या पायावर लोळण घेते. त्यामुळे या राजांचे शौकही मोठे असतात बुवा. त्यांच्या सवयी आणि जीवनशैली पाहून अनेक जण चक्रावून जातील. आपल्यासारखी सामान्य माणसं त्यांच्या एकंदरच थाटाची कल्पनाही करू शकत नाही. आता सौदीचे राजा सलमान यांचाच थाट पाहा ना! मोरोक्कोमध्ये ते सुट्टीसाठी चालले आहेत. या सहलीवर त्यांनी इतका खर्च केलाय की त्या खर्चाचा आकडा ऐकूनच तुमचे डोळे पांढरे फट्ट पडतील. या सहलीसाठी त्यांनी ६ अब्ज ४० कोटी ५५ लाखांहून अधिक रक्कम खर्च केलीये.

मोरोक्कोला पर्यटन व्यवसायातून जेवढा नफा मिळतो, त्यातील दीड टक्के रक्कम सलमान यांच्या या सहलीतूनच मिळाल्याचं म्हटलं जातंय. आपल्या सोबत मित्रपरिवार आणि नोकर-चाकर मिळून हजारो लोकांचा लवाजमा घेऊन ते जाणार आहेत. या सगळ्यांसाठी आलिशान हॉटेल बुक करण्यात आली आहेत. राजे स्वत: ७४ एकरावर वसलेलल्या अलिशान बंगल्यात राहणार आहेत. त्यांच्यासाठी गेल्या वर्षभरापासून या बंगल्याचं नुतनीकरणाचं काम सुरु आहे. या बंगल्यात सध्या मोरोक्कोचे तीस शाही सुरक्षारक्षक तैनात आहेत. तसेच वैदयकीय सुविधा, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये असतात तसे डायनिंग हॉलही आहेत. इस्राइलच्या एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ते सोबत २०० लक्झरी कारचा ताफाही घेऊन जाणार आहेत.

वाचा : अबुधाबीच्या युवराजांचं आलिशान विमान!

सौदी राजांची ही काही पहिलीच सहल किंवा पहिलाच दौरा नाही की ज्याची चर्चा होते आहे. फेब्रुवारी महिन्यात राजे सलमान इंडोनेशियाच्या दौऱ्यावर होते. फक्त नऊ दिवसांच्या दौऱ्यासाठी त्यांनी ५०० टन सामान सोबत नेलं होतं. याबरोबरच दिमतीला शेकडो नोकरांचा ताफा होताच. यासाठी राजानं वेगळे कार्गो विमानच सोबत नेलं होतं. या सामानाची काळजी घ्यायलाच ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना संरक्षण देण्यासाठी ९ हजार सैनिक देखील तैनात करण्यात आल्याचे वृत्त अनेक इंडोनेशियन वृत्तपत्रांनी दिलं होतं. राजासाठी जेवण तयार करण्यासाठी १५० शेफची नियुक्ती करण्यात आली होती तर इंडोनेशियाच्या ज्या ज्या मशिदींना ते भेट देणार होते, तिथेही अलिशान शौचालय बांधण्यात आली होती. जेव्हा सलमान यांनी २०१५ मध्ये वॉशिंग्टनला भेट दिली. तेव्हा २२२ खोल्यांचं आलिशन हॉटेलच त्यांनी बुक केलं होतं.

वाचा : सौदी युवराजांच्या ८० ससाण्यांची विमान सफर व्हायरल