सौदी अरेबियामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून यामध्ये पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाला आहे. आपल्या सात वर्षांच्या मुलासोबत वाळवंटामध्ये भटकंतीसाठी गेलेल्या या व्यक्तीची गाडी वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये अडकली. त्यानंतर तहानेने आणि थकव्यामुळे शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी होऊन या दोघांचाही मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा अपघात अजमानच्या खोऱ्यामध्ये झाला. हे दोघेही फेरफटका मारण्यासाठी या वाळवंटामध्ये गेले होते. यावेळी ऑफ रोडींग करताना म्हणजेच वाळूच्या ढिगाऱ्यामधून गाडी चालवताना त्यांची पिक अप ट्रक अडकला. गाडी बाहेर काढण्यासाठी हे दोघेही बराच वेळ प्रयत्न करत होते. रेस करुन, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न करुन गाडी ढिगाऱ्यातून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. गाडीचं तापमान वाढल्याने त्यांनी गाडी रेस करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न सोडून दिला.

हे दोघे ज्या भागामध्ये अडकले होते तिथे मोबाईलची रेंजही नव्हती. त्यामुळेच या दोघांनी चालत चालत जवळच्या मानवी वस्तीवर पोहचण्यासाठी प्रवास सुरु केला. बराच वेळ चालल्यानंतर त्यांना तहान लागली. मात्र दूर दूरपर्यंत वाळूचे ढीग सोडून काहीच दिसत नव्हतं. डोक्यावर तळपणारा सूर्य आणि वाढलेल्या तपमानामुळे वडील चक्क येऊन पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वडीलांच्या मृत्यूनंतरही मुलाने आपला प्रवास सुरु ठेवला. मात्र काही किलोमीटर चालल्यानंतर मुलालाही ग्लानी आली आणि तो जमीनीवर कोसळला. थकवा आणि तहान लागल्याने मुलाचाही मृत्यू झाला.

दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाने केल्यानंतर सौदीच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता या दोघांचे मृतदेह सापडले. दोघांचेही मृतदेह प्रिन्स सुल्तान रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saudi man 7 year old son die of thirst after vehicle gets stuck in desert scsg