Viral Video: जंगलातील प्राणी त्यांच्या गरजेनुसार अन्न, पाणी यांचा शोध घेत असतात. अनेकदा शोध घेत ते मानवी वस्तीकडेसुद्धा धाव घेतात. त्यामुळे जंगलाजवळ राहणारे लोक नेहमीच तेथील प्राण्यांच्या दहशतीखाली वावरत असतात. प्राणी जंगलातून बाहेर शेतात, रस्त्यावर तर कधी अंगणातसुद्धा फेरफटका मारतात. जंगलाजवळ राहणाऱ्या माणसांचा प्राण्यांशी नेहमीच सामना होत असतो; पण अशा प्राण्यांचा सामना करण्याची जंगलाजवळ राहणाऱ्या माणसांना सवय झालेली असते. त्यामुळे हे प्राणी आपल्यावर हल्ला करतील की नाही हेसुद्धा ते अचूक सांगू शकतात. तर आज केरळमध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं आहे. जंगलातील हत्ती मानवी वस्तीकडे येऊन तेथील आंबे, फणस हक्कानं खाताना दिसत आहेत.
अनेक प्रदेशात मानव-वन्यजीव संघर्ष सामान्य असतो. अनेकदा जंगलातील प्राणी माणसांवर हल्ला करतात. पण, चिल्लीकोंबन हा हत्ती हा या सगळ्या गोष्टींना अपवाद आहे. कारण- हा हत्ती जंगलातील इतर हत्तींपेक्षा थोडा वेगळा आहे. अधूनमधून ‘चिल्लीकोंबन’ जंगलाच्या सीमा ओलांडून मानवी वस्ती असलेल्या भागात प्रवेश करतात. तेथे राहणाऱ्या लोकांना त्रास न देता, तेथील फणस आणि आंबा या रसाळ फळांच्या सेवनाचा आनंद घेतात. त्यांच्या मनमोहक स्वभावासाठी ‘चिल्लीकोंबन’ हत्ती ओळखले जातात. तेव्हा एकदा पाहाच तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जंगलातील हत्ती मानवी वस्तीत आला आहे. हत्ती एका अज्ञात व्यक्तीच्या घरापाशी ठरलेल्या झाडाखाली उभा राहतो. आपल्या सोंडेनं तो झाड हलवून आंबे खाली पाडतो. चिल्लीकोंबन म्हणून ओळखला जाणारा हा हत्ती आता नियमितपणे आंबा आणि फणस खाण्यासाठी लोकवस्तीच्या भागात येतो आणि हक्काने तेथील आंबे आणि फणस झाडावरून पाडून, त्यांचे सेवन करताना दिसतो; जो सध्या अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @airnewsalerts या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केरळच्या आंबा, फणस आवडीने खाणाऱ्या चिल्लीकोंबन हत्तीची गोष्ट सांगण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी या प्रेमळ हत्तीची प्रशंसा करीत आहेत. “खाऊ देत त्यांना… आपण त्यांच्या प्रॉपर्टीवर राहतोय. त्यांची घरं तोडून आपण स्वतःची हक्काची घरं बांधली आहेत”, अशी कमेंट एका युजरनं केली आहे. एकूणच सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांची मनं जिंकत आहे.