IRS Sachin Sawant Story: मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) अधिकारी सचिन सावंत यांनी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला १.७५ लाख रुपये किमतीचे पैंजण भेट दिल्याचा प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. याशिवाय सावंत यांनी कुटुंबाच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा केली असल्याचा सुद्धा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे. सावंत हे २००८ च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत. २००७ मध्ये युपीएससीच्या परीक्षेत चौथ्या प्रयत्नात त्यांनी ४१४ वी रँक मिळवली होती. तर सचिन सावंत यांचे वडील स्वतः पोलीस होते. सचिन यांनी इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये बीई केले आहे. तपासात असे दिसून आले होते की, सावंत यांनी अवैध उत्पन्नाच्या स्रोतातून तब्बल ४.११ कोटी रुपये जमा केले होते.
सचिन सावंत यांच्यावर काय आरोप आहेत?
इंडिया टुडेने प्रवेश केलेल्या आरोपपत्रानुसार, सावंत यांनी त्यांचे वडील, भाऊ आणि आई यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा केली. नवी मुंबईतील मालमत्ता आणि काही आलिशान गाड्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरली गेली. गेल्या महिन्यात, ईडीने सचिन सावंत आणि त्याचे वडील बाळासाहेब सावंत, भाऊ संदीप, त्यांचा मित्र शशी चव्हाण आणि सेव्हन हिल्स कॉन्स्ट्रोवेल आणि थ्रीजी आयडी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या दोन संस्थांसह इतर तीन लोकांविरुद्ध आरोपपत्र सादर केले.
नव्या नायर आणि पैंजण प्रकरण
ईडीच्या तपासादरम्यान एजन्सीने सावंत यांचा ड्रायव्हर समीर नलावडे याची चौकशी केली. त्यांनी सांगितले की दाक्षिणात्य अभिनेत्री नव्या नायर ही सावंत यांची मैत्रीण होती आणि सावंत त्यांच्या नवी मुंबईच्या इमारतीतून कोचीला गेल्यावर सावंत तिला कोचीमध्ये भेटायला अनेक वेळा गेले होते. ड्रायव्हरने सांगितले की, सावंत यांनी तिला १.७५ लाख रुपयांचे पैंजण भेट केले होते. दुसरीकडे, सावंत यांनी आरोप फेटाळून लावले आहेत व आपण कोचीला केवळ देवदर्शनासाठी गेलो होतो असेही ते म्हणाले.
या प्रकरणातील सहआरोपी शशी चव्हाण यांनी सावंत यांच्या पत्नी आणि मेहुणीला दरमहा ४० हजार रुपये पगार देणारी फर्मही तयार केली होती. चव्हाण यांनी तयार केलेल्या संस्थांमार्फत पगाराच्या नावाखाली कुटुंबाला अवैध पद्धतीने जमा केलेली रक्कम मिळत होती.
सचिन सावंत विरुद्ध सीबीआय या एफआयआरनुसार, त्यांच्याकडे २.४५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सुद्धा असल्याचे समजले आहे. झाली, जी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या २०४ टक्क्यांहून अधिक होती. जानेवारी २०११ ते ऑगस्ट २०२० दरम्यान सावंत हे सीमाशुल्क, IRS (कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज) चे संयुक्त आयुक्त होते. जूनमध्ये त्यांना लखनऊमध्ये अटक करण्यात आली होती जिथे ते जीएसटी आणि कस्टम्सचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त होते. सावंत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात १.२५ कोटींहून अधिक रक्कम जमा असल्याचे तपासात निदर्शनास आले होते या प्रकरणात ईडीने सावंत, त्यांचा भाऊ आणि मेहुणी यांची २. ३८ कोटी रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.