Fraudster impersonates MS Dhoni to con cricket fans : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी अनेकदा सोशल मीडियापासून दूर असतो. पण, नुकतीच त्याच्या संदर्भात एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात महेंद्रसिंग धोनी रांचीमध्ये अडकल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पाकीट विसरल्याने सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून ऑनलाइन ६०० रुपयांची मागणी केल्याचे सांगितले आहे. पण, चाहत्यांनी या पोस्टवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळे ही पोस्ट नेमकी खरी आहे की खोटी जाणून घेऊ…
नेमकं प्रकरण काय?
सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढतायत. यात फसवणूक करणारे भामटे क्रिकेट चाहत्यांना लक्ष्य करत आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या नावाने युजर्सची ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. या संदर्भात नुकतीच एक घटना समोर आली, ज्यात एका ठगाने इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीला मेसेज करत पैशांची मागणी केली. या मेसेजमध्ये ठगाने आपण एमएस धोनी असल्याचा दावा केला. मेसेजमध्ये धोनी असल्याचे भासवणाऱ्या ठगाने सांगितले की, पाकीट विसरल्याने तो रांचीमध्ये अडकला आहे.
ऑनलाइन ठगाने mahi77i2 (धोनीचे अधिकृत हँडल mahi7781) या नावाने धोनीच्या बनावट अकाउंटद्वारे मेसेज केला होता. या मेसेजमध्ये त्याने घरी जाण्यासाठी मला ६०० रुपयांची गरज असल्याचे सांगतिले आहे. हा मेसेज खरा असल्याचे भासवण्यासाठी ठगाने पुरावा म्हणून धोनीचा एक सेल्फीदेखील पाठवला. अशाप्रकारे ऑनलाइन ठग लोकांची फसवणूक करत आहेत.
ऑनलाइन ठगाने पाठवलेल्या मेसेजची पोस्ट आता व्हायरल झाली असून त्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या घटनेनंतर लोकांना सावधतेचा इशारा दिला आहे. तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही मेसेज, फोन कॉल्सला उत्तर देऊ नका, असेही सांगितले आहे.
पण, अशाप्रकारे ऑनलाइन ठग व्यक्तीचे नाव, प्रोफाईल फोटोचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे असे काही मेसेज आल्यास काळजी घ्या. तुम्ही ओळखत नसलेल्या कोणालाही पैसे पाठवू नका.