सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून असे लोक अशा प्रकारचे व्हिडीओ करीत असतात. काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी अनेक लोक आपली हद्द पार करू लागले आहेत. त्यात तरुणांची आणि लहान मुला-मुलींची संख्या जास्त आहे. आताच्या पिढीतील काही मुलं जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत.
शिकण्याच्या वयात ही मुले-मुली चुकीच्या मार्गावर जात आहेत. सगळ्याचं भान विसरून थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या एक असाच लाजिरवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये शाळेतील तीन अल्पवयीन मुली रील्ससाठी सिगारेट ओढताना दिसत आहेत.
शाळकरी मुलींनी ओलांडली मर्यादा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये तीन लहान मुली धूम्रपान करत रील्स बनवताना दिसत आहेत. शाळेतील अल्पवयीन मुली गणवेशात सिगारेट ओढत आनंद घेताना दिसत आहेत. तसंच हे सगळं करताना याचा व्हिडीओदेखील त्यांनी रेकॉर्ड केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @pachlakar_boy_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “आई-बाबांना वाटत असेल आमची मुलगी शिकत आहे”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला चार लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान या मुली नेमक्या कोण आणि कुठल्या आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही.
युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “नीट पेनही पकडता येत नाही आणि सिगारेट पकडायला चालल्या आहेत.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “मुलगी शिकते म्हणजे प्रगती होते असं म्हणतात, पण इथे मुलगी शिकून दुसऱ्या मार्गाला लागतेय असं दिसतंय.” तर तिसऱ्याने “आई-वडिलांनी हेच शिकायला पाठवलं होतं असं दिसतंय”, अशी कमेंट केली.