स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जवळ आले की शाळांमध्ये परेडची तयारी सुरु केली जाते. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडून या परेडसाठीची जोरदार तयारी करुन घेतात. कारण स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमांसाठी शाळेमध्ये अनेक प्रमुख पाहुणे येत असतात. शिवाय विद्यार्थ्यांचे पालकही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून सर्व नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि परेड व्यवस्थित व्हावी हा शिक्षकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांकडून मुख्य कार्यक्रमापूर्वी भरपूर सराव करुन घेतात.
हेही वाचा- दुर्दैवी : एका पेन्सिलमुळे गमावला चिमुकलीने जीव, भावासोबत अभ्यास करत असतानाच…
मात्र, सध्या एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या परेडचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून या मुलांची परेड आहे की पोलिस भरतीचा सराव सुरु आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. शिवाय या व्हिडीओमधील मुलांची परेड करण्याचा उत्साह पाहून तुम्हाला तुमच्या बालपणीची परेड आठवेल यात शंका नाही. सोशल मीडियावर शाळकरी विद्यार्थ्यांचे रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते व्हिडीओ पाहून आपलं देखील मनोरंजन होतं. त्यामध्ये कधी लहान मुल क्लास सुरु असताना मध्येच झोपल्याचे तर कधी आपल्या आवडत्या शिक्षकांनी शिक्षा केल्यावर त्यांना मनवतानाचे हे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या यापेक्षा वेगळा मात्र, शाळेमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही शाळकरी मुलं पोलीस किंवा लष्कराचे जवान ज्याप्रमाणे परेडचा जोरदार सराव करताना त्याप्रकारे ही मुलं परेड करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काही मुले शाळेच्या मैदानात अत्यंत सावध मुद्रेत उभी आहेत. हे सर्वजण परेडचा सराव करत असून ते हातापायांची हालचाल अत्यंत चपळाईने करताना दिसतं आहेत.
हा व्हिडिओ पाहून या शाळकरी मुलांचे कौतुक नेटकरी करत आहेत. लहान वयात इतक्या अचूकतेने परेड करणे सोपे काम नाही. ही मुले खूप हुशार तर आहेतच, पण त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांचाही यात महत्त्वाचा वाटा असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. शिवाय ही मुलं एवढ्या लहान वयात अशा प्रकारे परेड करत असतील तर मोठी झाल्यानंतर ते नक्कीच पोलिस आणि आर्मीच्या परेडला टक्कर देऊ शकतात असंही नेटकरी म्हणत आहेत.