School Students Viral Video : रील्स करण्याच्या नादात शाळकरी मुलांनी अलिशान गाड्यांचा ताफा रस्त्यावर उभा केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातच्या सूरतमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली असून कार मालकांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूरतच्या जहांगीरापुरा येथील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशात शाळकरी मुलं बीएमडब्ल्यू, मर्सिडिजसह अनेक अलिशान गाड्यांचे रीलसाठी चित्रिकरण करताना दिसत आहेत. यासाठी रस्त्यावर सुमारे ३० अलिशान गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत. या रीलसाठी त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर केल्याचा पोलिसांनी सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करायला सुरुवात केली.

पोलिसांनी माध्यमांना सांगितलं, गाड्यांचा ताफा एका शाळेजवळ उभा होता. तिथे चित्रिकरण सुरू होतं. आम्ही आमच्या चौकशीचा भाग म्हणून कार मालकांना जहांगीरपुरा पोलीस ठाण्यात बोलावण्यास सुरुवात केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ही वाहने पुरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असं वाहतूक पोलीस उपायुक्त अनिता वनानी म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून रीलची क्रेझ वाढत आहे. या रीलच्या नादात विद्यार्थी कोणत्याही थराला जातात. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ही क्रेझ सर्वाधिक दिसून येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडे एवढ्या अलिशान गाड्या कुठून आल्या, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या आणि पादचरी लोकांच्याही जीवाला धोका असतो, असंही वनानी म्हणाल्या.

“ही बाब गंभीर आहे आणि या व्हिडिओच्या संदर्भात वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणारे किंवा सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कोणीही आढळल्यास कठोर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल”, असा इशारा वनानी यांनी दिला. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व कारमालकांची ओळख पटविण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.