विमान प्रवास म्हटलं की पहिल्यांदाच जाणाऱ्या अनेकांच्या पोटात शब्दश: गोळा येतो! कारण विमान हवेत झेपावतं, तेव्हा अनेकांची घाबरगुंडी उडते. पण सध्या एअर इंडियाच्या एका विमानाचा चक्क ‘बाय रोड’ अर्थात जमिनीवरून प्रवास चालू आहे. तोही थोडाथोडका नसून थेट मुंबई ते आसाम! आता इथे रस्त्यांवरून जाताना गाड्यांना इतका त्रास सहन करावा लागतो, तिथे हे तर आख्खं प्रवासी विमान आहे. झालंही तसंच. मजल दरमजल करत हे विमान मुंबईहून बिहारपर्यंत पोहोचलं खरं, पण तिथे विमानासमोर खरी समस्या उभी राहिली!
हवेतून प्रवास करताना जेवढ्या अडचणींचा सामना विमानाला करावा लागत नाही, त्यापक्षा कित्येक पटींनी जास्त अडचणींचा सामना या विमानाला जमिनीवरून प्रवास करताना करावा लागला. त्याचं झालं असं, की हे विमान मुंबईहून आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आसामच्या दिशेनं निघालं. हवेत उड्डाण घेऊन नव्हे, तर जमिनीवरून! भंगारात काढलेलं हे विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका अजस्त्र ट्रॉली क्रेनच्या सहाय्याने आसामला नेलं जात होतं. शुक्रवारी सकाळी ते बिहारच्या मोतीहारी भागात पोहोचलं आणि तिथेच विमानाला रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या समस्यांचा साक्षात्कार झाला!
ग्राहकाची स्विगीकडे अनोखी डिमांड! पोस्ट पाहून डिलिव्हरी बॉय थेट पोहोचला तरुणाच्या घरी; पाहा VIDEO
विमान पुलाखाली अडकलं अन् ट्रॅफिक भडकलं!
या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे विमान नेणारी ट्रॉली मोतीहारी भागातील पिपराकाठी उड्डाणपुलाच्या खालून जात असताना विमानाच्या उंचीमुळे ते तिथेच अडकलं. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रॅफिकचा खोळंबा झाला. बरं आकाशातलं विमान चक्क जमिनीवर अवतरल्यामुळे बघ्यांचीही मोठी गर्दी जमली. त्यामुळे वाहतूक आणखीनच खोळंबली.
शेवटी विमानाच्या मदतीला ट्रकचालक धावून आले. त्यांनी ट्रॉलीच्या चालकाला मार्गदर्शन करत विमान सहीसलामत त्या उड्डाणपुलाच्या खालून पुढील दिशेनं मार्गस्थ होईल यासाठी मदत केली. अखेर काही तास वाहतुकीचा खोळंबा केल्यानंतर हे विमान आसामच्या दिशेनं मार्गस्थ झालं!