SDM Officer Jyoti Maurya Reacts To Trolls: ऑफिसर ज्योती मौर्या व त्यांचे पती आलोक कुमार हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एसडीएम ज्योती मौर्या यांना अधिकारी बनल्यावर पतीला घटस्फोट देण्यावरून ट्रोल केले जात आहे. ज्योती यांचे पती म्हणजेच आलोक कुमार यांनी ज्योती यांच्या शिक्षणासाठी प्रचंड मेहनत व खर्च केला होता मात्र अधिकारी बनल्यावर अन्य एका अधिकाऱ्याच्या प्रेमात पडून ज्योती यांनी नवऱ्याकडून घटस्फोटाची मागणी केली जात असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. यानंतर मध्यंतरी ज्योती यांनी आलोक यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सांगणारा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. या एकूण चर्चेवर पहिल्यांदाच ज्योती मौर्या यांनी मौन सोडले आहे.
माध्यमांशी बोलताना, नवऱ्यासह वाद हे खाजगी प्रकरण आहे व त्यासंदर्भात कोर्टात खटला सुरु आहे. हा मुद्दा सोशल मीडियावर आपण आणू इच्छित नाही असे ज्योती म्हणाल्या. मात्र यावेळी त्यांनी बक्सरमधील एका प्रकरणावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. बक्सरमधील पिंटू नामक एका व्यक्तीने शिक्षणासाठी प्रयागराज येथे राहणाऱ्या आपल्या पत्नीला घरी परत बोलावून घेतले होते. या महिलेने सांगितल्यानुसार ती BPSC ची तयारी करत असताना ज्योती मौर्या प्रकरण चर्चेत आल्याने तिच्या नवऱ्याने म्हणजेच पिंटूने तू सुद्धा ज्योती मौर्य सारखी सोडून जाशील अशा भीतीने तिला माघारी येण्यास सांगितले आहे. याप्रकरणी ज्योती यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
ज्योती म्हणाल्या की, “मी आता ज्या पदावर आहे तिथून मी महिलांसाठी जसं शक्य होईल जितकं शक्य होईल तितकं काम करण्याचा प्रयत्न करतेय. आणि महिलांना शिक्षणापासून थांबवण्याचा कोणाला अधिकारच नाही. त्यांना शिकू देतील की नाही हा प्रश्न कुठून येतो? शिक्षण हा त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे. जर महिलांना स्वतःला काही करायचे असेल तर त्या निश्चितच करू शकतील व प्रगतीही करतील. “
दरम्यान, ज्योती मौर्या व आलोक कुमार यांच्या घटस्फोटाचा खटला सध्या कोर्टात सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. आलोक हे एक सफाई कर्मचारी आहेत. ज्योती व आलोक यांचे लग्न २०१० मध्ये झाले होते व त्यांना दोन जुळ्या मुली सुद्धा आहेत.