कॅनडाच्या समुद्रकिनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी मोठी दुर्घटना होता होता टळली. समुद्रात राहणाऱ्या सी लायनने एका चिमुकलीची शिकार करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ओढत समुद्रात नेलं. पण शेजारी असलेल्या एका तरूणाने प्रसंगावधानता दाखवत या मुलीची मृत्यूच्या जबड्यातून सुखरुप सुटका केली. नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती.

एक चिमुकली मुलगी तिच्या आई वडिलांसहित कॅनडातल्या एका गोदीवर उभी होती. समुद्रात असणारे सी लायनला खाद्य भरवण्यात ती आणि आजूबाजूचे पर्यटक मग्न होते. समुद्रातल्या एका प्राण्याला एवढ्या जवळून पाहण्याचा मनमूराद आनंद सगळे लुटत होते. ही मुलगी कंटाळून गोदीच्या कठड्यावर बसली एवढ्यात एक सी लायनने तिच्यावर मागून हल्ला केला. तिला आपल्या जबड्यात पकडून त्याने समुद्रात खेचून नेले. अगदी काही सेकंदात हे घडलं, त्यामुळे अनेकांचा भितीने गोंधळ उडला . पण तिथेच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने क्षणभरही विचार न करता समुद्रात उडी मारली आणि या मुलीला वाचवून पाण्याबाहेर सुखरूप आणलं. सुदैवाने ही मुलगी यातून थोडक्यात बचावली.

या गोदीवर अनेक पर्यटक खास सी लायन पाहण्यासाठी येतात. तेव्हा या प्राण्यांच्या अधिक जवळ न जाण्याच्या सूचना तिथे पावलोपावली लावल्या आहेत. पण काही पर्यटक या सूचनांचे अजिबात पालन करत नाही. याआधीही या प्राण्यांनी अनेकांवर हल्ले केले आहेत पण तरीही लोक या सूचनांकडे सपशेल दुर्लक्ष करतात हे पुन्हा एकदा या घटनेने समोर आले आहे.

Story img Loader