महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय राहून नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतात. माणसांमध्ये दडलेलं छुपं टॅलेंट जगासमोर आणण्याचा प्रयत्नही महिंद्रा व्हिडीओंच्या माध्यमातून करत असतात. त्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांना नेहमी प्रेरणादायी वाटतात. त्यामुळे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळतो. आनंद महिंद्रा यांनी सील माशाचा शेअर केलेला एक व्हिडीओही प्रचंड गाजला आहे. समुद्रात राहणारा सील मासा जेव्हा स्विमिंग पूलमध्ये उडी मारुन ऐटीत पोहायला लागतो, तेव्हा पट्टीचे पोहणारी माणसंही त्या सील माशासमोर फिके पडतील, अशाच प्रकारचा संदेश या व्हिडीओतून मिळत आहे. विकेंड एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचं खरं मनोरंजन या सील माशानेच केलं आहे. अशा लोकांना हा व्हिडीओ समर्पित करण्यात आला आहे.
सील मासा समुद्राच्या पाण्यातून बाहेर येऊन एका रिसॉर्टच्या पायऱ्यांवरून थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. त्यानंतर पाण्यात मस्त डौलाने डुबकी मारून तो मासा सूर्याच्या किरणांना साक्ष देण्यासाठी मॅटवर विश्रांती घेतो. हे दृष्य पाहून आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनाही आश्चर्याचा धक्का बसतो. काहींना सील माशाचे हे चाळे पाहून लोटपोट हसू येतं. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला जवळपास ५६ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, “या सील माशाला एक ग्लास बिअरची आणि सन टॅन लोशनची गरज आहे. ज्यामुळे त्याला आराम मिळेल.” दुसऱ्या युजरने म्हटलं, “आता प्राणीही माणसांच्या जीवनशैलीप्रमाणे राहताना दिसत आहेत.” अन्य एका युजरने म्हटलं, “सील माशाचे हे कृत्य मी प्रत्येक सेकंदाला पाहत होतो, अरे देवा! आता माणसं मागे पडतील.” सील माशाची बुद्धी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या माशाने जे काही केलं ते अप्रतिम आहे. माणसांप्रमाणेच आता प्राणी, मासे वागायला लागले आहेत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत.