परिस्थिती कोणतीही असो त्या परिस्थितीत माणसाला शांत राहता आलं पाहिजे, ज्या व्यक्तीचा स्वत:वर संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात आलेल्या कोणत्याही प्रसंगाला अगदी निडरपणे तोंड देऊ शकतो. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बघा ना! कमालीचा संयम दाखवत आणि स्वत:ला शांत ठेवत बँकेच्या सुरक्षारक्षकांने अगदी सहजपणे चोरी रोखली. तेव्हा या ‘कूल’ सुरक्षारक्षकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

अनेकदा बंदुकीचा धाक दाखवून चोर बँकेत शिरतात, बँकेतल्या कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवतात. रोकड लु़टून पसार होतात. कधी कधी या चोरीत प्रतिकार करणाऱ्या सुरक्षारक्षकांचा किंवा कर्मचाऱ्यांचा जीव घ्यायलाही चोर मागे पुढे पाहत नाही. अनेकदा अशी घटना घडली की कर्मचारी घाबरून जातात, जीव वाचवण्यासाठी शांत बसतात. पण मॅक्सिकोच्या बँक कर्मचाऱ्याने असे काहीही केले नाही. काचेच्या दरवाजातून तीन- चार दरोडेखोरांची टोळकी त्याला येताना दिसली. तेव्हा तो शांतपणे चालत आला आणि आतून सेन्सॉर लॉकच्या साह्याने दरवाजा बंद केला. जणू काही घडलंच नाही अशा भावात शांतपणे उभा राहिला. चोर बँक लुटायला येत असताना संयम दाखवणं कोणा दुसऱ्याला एखादं वेळी सुचलंही नसतं पण त्याने मात्र अत्यंत शांतपणे हे करून दाखवलं.