Seema Haider Become Mother: पाकिस्तानमधून चार मुलांसह अवैधरित्या प्रवेश केलेल्या सीमा हैदरने पाचव्या बाळाला जन्म दिला आहे. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या घरात मुलीचे आगमन झाले आहे. २०२३ साली सीमा हैदर पाकिस्तानमधील पतीला सोडून भारतात आली होती. तेव्हा तिच्याबद्दल बरीच चर्चा झाली. तपास यंत्रणांनी तिची चौकशीही केली होती. बरीच टीका झाल्यानंतरही सीमा आणि सचिन यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. सीमा हैदर यांना बहीण माननारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह यांनी पीटीआयशी बोलताना सीमा हैदरला मुलगी झाल्याची बातमी दिली.

मुलीच्या नावासाठी सूचना द्या

वकील एपी सिंह म्हणाले की, आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे. काही दिवसांत नामकरणाचा विधी पार पडणार आहे. त्याआधी सोशल मीडियावरून सुचविण्यात येणाऱ्या नावांचे स्वागत केले जाईल, असेही ते म्हणाले. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या न्यायालयीन लढाईचे काम वकील एपी सिंह यांनी केले होते. तेव्हापासून सिंह यांनी सीमा हैदरला बहीण मानले होते.

मुलीला जन्म देण्याआधी नोएडा येथील रबूपुरा भागातील सचिन मीणाच्या निवासस्थानी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमासाठी वकील एपी सिंह आणि त्यांचे कुटुंबियही सहभागी झाली होते. यावेळी सचिन मीणाच्या नातेवाईकांनी पारंपरिक गाणी सादर करून हा सोहळा रंगतदार केला होता.

सीमाच्या पतीने काय प्रतिक्रिया दिली होती?

डिसेंबर २०२४ मध्ये जेव्हा सीमा हैदर गर्भवती असल्याची बातमी पहिल्यांदा बाहेर आली, तेव्हा पाकिस्तानमधील तिच्या पहिल्या पतीने नाराजी व्यक्त केली होती. तिचा पहिला पती गुलाम हैदर एका युट्यूब वाहिनीशी बोलताना म्हणाला की, जिने आपल्या पहिल्या चार मुलांचा विचार केला नाही, ती आता पाचव्या बाळाचा काय विचार करणार? माझ्या न्यायालयीन लढाईला वेळ लागत आहे, पण मला विश्वास आहे की, शेवटी माझा विजय होईल. पती म्हणून मी असतानाही तिने परपुरूषाशी संबंध प्रस्थापित केले आहेत, तरीही ती बिनधोकपणे हसताना दिसते. या बाईला काय म्हणायचे?

वर्ष २०२३ मध्ये सीमा हैदरने नेपाळमार्गे पाकिस्तानमधून भारतात अवैधरित्या प्रवेश केला होता. तिच्यासह तिचे पहिल्या पतीपासून झालेले चार मुलेही आले होते. २०१९ साली सीमाचा पती गुलाम हैदर हा नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला होता. २०२० साली सीमा हैदरची पबजी गेमद्वारे सचिन मीणाशी मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि पुढे त्यांनी नेपाळमध्ये एकमेकांची भेट घेतली. सीमाने केलेल्या दाव्यानुसार तेव्हाच त्यांनी नेपाळच्या एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती.