Seema Haider Job Offer Monthly Salary: प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आल्यावर सीमा हैदर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे नवीन घरात सीमा व सचिन राहायला गेले आहेत. संशयास्पद वर्तणुकीमुळे मागील काही दिवस यूपी ATS कडून सीमा व सचिन दोघांची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे सीमा तिच्या चार मुलांना घेऊन भारतात आली आहे. सीमाविषयी बोलताना शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचं शिक्षण पाचवी पर्यंत झाल्याचं ती सांगते पण तिला टेक्नॉलॉजी उत्तमरीत्या वापरता येते, इंग्रजी सुद्धा ती अगदी अस्खलित बोलू शकते, मुळात याच गोष्टींमुळे तिच्यावर संशय येत असल्याचेही शेजारी व नातेवाईक सांगतात. पण आता काही दिवसांपासून सीमा व सचिन दोघांचेही दिवस पालटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सीमा आणि सचिन यांनी काम नसल्याने खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याचे सांगितले होते. यानंतर एका प्रोड्युसरने चक्क तिला सिनेमाची ऑफर देऊ केली होती. याच पाठोपाठ आता घरबसल्या सीमा व सचिनसाठी नोकरीचे ऑफर लेटर सुद्धा आले आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार गुजरातमधील एका उद्योजकाने सीमा-सचिनला भल्या मोठ्या वार्षिक पगाराच्या पॅकेजसह नोकरी ऑफर केली आहे. यासंबंधित पत्र सुद्धा नुकतेच त्या दोघांना मिळाले आहे.
यूपीच्या ग्रेटर नोएडामध्ये रबूपुर गावात सचिन आणि सीमा राहतात. या घरी रात्री उशिरा एक पोस्टमन चिठ्ठी घेऊन आला होता. सीमाला ती चिठ्ठी उघडून त्यात काय लिहिलय ते वाचायच होतं. पण सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाने रोखले.
जवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बद्दल माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चिठ्ठी उघडण्यात आली, ज्यानुसार गुजरातच्या एका व्यावसायिकाने त्यात नोकरीची ऑफर दिली होती. सचिन आणि सीमा दोघांना महिना ५० हजार रुपये पगाराची ऑफर दिली होती. म्हणजे दोघांचा वार्षिक पॅकेज प्रत्येकी ६ लाख रुपये होतं.
दरम्यान, सीमा व सचिनच्या नातेवाईकांनी याविषयी फार आनंद व्यक्त केलेला नाही उलट असे कोणतेही निर्णय घेण्याआधी सीमाच्या विरुद्ध सुरु असलेला तपास पूर्ण व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. तसेच या दोन्ही ऑफर्स देणाऱ्यांचा मूळ हेतू काय असेल याविषयीही त्यांनी शंका वर्तवली आहे. दुसरीकडे सीमा किंवा सचिन या दोघांनी अद्याप ही ऑफर स्वीकारलेली नाही.