पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची ‘लव्ह स्टोरी’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चार लेकरांची आई असलेल्या सीमा हैदरने आपल्या प्रियकरासाठी बेकायदेशीरपणे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली. ऑनलाईन गेम ‘पबजी’च्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पण सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सीमा हैदरची शेजारीण मिथिलेश भाटी ही सचिनचा उल्लेख ‘लप्पू’ आणि ‘झिंगूर’ असा करत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीमा हैदरच्या वकिलाने शेजारीण महिला मिथिलेश भाटीवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. सीमाचे वकील एपी सिंग यांनी सांगितलं की, मिथिलेश भाटी यांनी सचिनबद्दल अपमानजनक टिप्पणी केली आहे.
मिथिलेश भाटी यांनी प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींमध्ये सचिनचा उल्लेख ‘झिंगूर सा’ आणि ‘लप्पू सा’ असा केला. या मुलाखतींनंतर, मिथिलेश रातोरात चर्चेचा विषय बनल्या. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढली. आता सीमाचे वकील एपी सिंह या वक्तव्याबद्दल मिथिलेश भाटी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
ही टिप्पणी म्हणजे देशातील प्रत्येक पतीचा अपमान असल्याचं एपी सिंह यांनी सांगितलं. “आपल्या वैविध्यपूर्ण देशात त्वचेचा रंग आणि शारीरिक गुणधर्मांवर आधारित टिप्पणी सहन केली जाणार नाही. आम्ही संबंधित महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत,” असं वकिलाने सांगितलं.
यावर आता मिथिलेश भाटी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणाचाही अपमान केला नाही, असं तिने म्हटलं आहे. “रागाच्या भरात माझ्या तोंडून ते शब्द निसटले. आमच्या इथे स्थानिक स्तरावर बोली भाषेत सामान्यतः असे शब्द वापरले जातात. लोक मलाही ‘लप्पी’ म्हणतात पण याचा अर्थ मी ‘लप्पी’ आहे, असा होत नाही. मी कोणाचाही अपमान केलेला नाही,” असं मिथिलेश भाटी यांनी म्हटलं.