सेल्फीचे खुळ बरचेदा जीवावर बेतते, कित्येकदा नको तिथे सेल्फी काढू नका असा १० वेळा बजावूनही काहींना ते कळत नाही. मग या सेल्फीच्या नादापायी हात पाय तरी मोडून घेतात किंवा कायमचा जीव तरी गमावावा लागतो. राजस्थानमधील माउंट अबु येथे अजगरासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलाच भोवला. माऊंट अबु येथे काही गावकरी मोठ्या अजगराला पकडून नेत होते. या अजगराला पाहण्यासाठी आजूबाजूची बरीच मंडळी जमली होती. त्यातले काही लोक या अजगराला नेतानाचे चित्रिकरण करत होते अशातच एका तरुणाने अजगराच्या जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अजगराने त्याच्या खांद्याचा चावा घेतला.
येथील काही लोक अजगराला पकडून नेत होते तेव्हा त्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. अजगरामुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो हे माहित असतानाही अनेक लोक या अजगराचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण करत होते. तर काही जण त्याचे फोटो काढण्यात गुंग होते. या गर्दीमधला एक तरूण सारखा अजगरासोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला त्याने लांबून फोटो घेण्याचा प्रयत्न केला पण नंतर मात्र तो या अजगराच्या अधिक जवळ गेला. जवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात मग्न असलेल्या या तरूणावर अजगराने काही कळायच्या आतच हल्ला केला. या तरुणाच्या खांद्याचा चावा त्याने घेतला. अजगराच्या या हल्ल्यामुळे आजूबाजूचे सगळेच घाबरले आणि गोंधळ निर्माण झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ प्रकाशित केला.
#WATCH Mount Abu (Rajasthan): Selfie with a python? Think again… pic.twitter.com/rHxLbL1SwH
— ANI (@ANI) September 23, 2016