Seller wearing dress viral video: कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. काम हे काम असतं आणि ते मेहनतीनं केलं की, यश नक्कीच मिळतं. एकदा काम करण्याचा निर्णय घेतला की, कोणत्याही कामाची लाज वाटून चालत नाही. मग त्यासाठी आपण जे शक्य असेल ते करतो. आणि आपल्याच कामात आनंद शोधला की, सगळ्या गोष्टी अगदी सोप्या वाटू लागतात. सध्या अशाच एका ड्रेस विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ड्रेस विक्रेत्याने ड्रेस विकण्यासाठी जे केलं ते पाहून, तुम्हीही त्याचं कौतुकच कराल.

व्यवसाय करावा तर असा…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एका दुकानात एक विक्रेता ग्राहकांना चक्क ड्रेस घालून दाखवतोय. ड्रेसची विक्री व्हावी यासाठी अशी भन्नाट कल्पना ड्रेस विक्रेत्याने केली आहे. कसलीच लाज न बाळगता, ड्रेस घालून तो ग्राहकांना त्याच्याविषयी सांगताना दिसतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला काय विकायचं आहे हे समजलेलं असतं. त्यामुळे सोबत कोण आहे, कोण नाही याचा विचार तो करीत नाही. तर जे आपण कमावलंय आणि जे आपल्याला हवंय ते आपण स्वतः उभं करू शकतो याचा विचार तो करतो’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये “एका व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय त्याच्या जीवापेक्षाही प्रिय असतो. त्यामुळे तो न लाजता प्रत्येत ठिकाणी शंभर टक्के देतो”, असंही लिहिण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ३६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “एक माणूस कमावण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी काहीही करू शकतो.” तर दुसऱ्यानं “तुमच्याकडे खरोखर सेल्समन कौशल्य आहे”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “हा व्हिडीओ अपलोड करण्याची काहीही गरज नव्हती. विचार करा, त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल?”