दक्षिण कोरियातील एका डेअरी कंपनीवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डेअरी कंपनीने आपल्या एका जाहिरातीत महिलांची तुलना गायीशी केल्याने सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. जाहिरात प्रसारित होताच सोशल मीडियावर वाद पेटला होता. वाढता वाद पाहून डेअरी कंपनीने आपल्या जाहिरातीबद्दल माफी मागितली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सियोल ही कोरियातील सर्वात मोठी दूध कंपनी आहे. या कंपनीची वादग्रस्त जाहिरात ३७ सेकंदांची आहे. या जाहिरातीत एक माणूस जंगलात शूटिंग करत असल्याचे दिसत आहे. महिला नैसर्गिक ओढ्याचे पाणी पिताना दिसत आहेत. तर व्यक्ती चोरून चित्रीकरण करत असल्याचं जाहिरातीत दिसत आहे.
यानंतर तो व्यक्ती महिलांच्या अधिक जवळ जात शूटींग करण्याचा प्रयत्न करतो. मात्र पालापाचोळ्यावर पाय पडताच आवाज होतो आणि महिला गायी होतात. डेअरी कंपनीचा या वादग्रस्त जाहिरातून स्वच्छ पाणी, सेंद्रिय खाद्य खात गायीचं, १००% शुद्ध सियोल दूध असल्याचा दावा करण्यात आला आहे. “चोंगजांगच्या प्रसन्न निसर्गातील सेंद्रिय शेतातील सेंद्रिय दूध” या टॅगलाइनसह जाहिरात समाप्त होते.
डेअरी कंपनीच्या या जाहिरातीत काही महिला स्वच्छ पाणी, हिरवी पाने, नैसर्गिक वातावरणात दिसत आहेत. या जाहिरातीत महिलांची तुलना गायीशी केल्याचा आरोप दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या डेअरी कंपनीवर करण्यात आला आहे. मात्र वाद वाढल्यानंतर कंपनीने माफी मागितली आहे. २९ नोव्हेंबर रोजी सियोल मिल्कची जाहिरात अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली होती. लोकांच्या प्रतिक्रिया पाहता डेअरी कंपनीने माफी मागितली आहे. सध्या कंपनीने अधिकृत युट्यूब चॅनलवरून जाहिरात काढून टाकली आहे. मात्र इतर युट्यूब चॅनेलवर दिसत आहे.