मजहब नहीं सिखाता आपस मे बैर रखना, विविधतेमध्ये एकता यासारखी अनेक वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर या वाक्यांना चित्ररुप देणारा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटो आहे भारतीय लष्करातील जवानांचा. वेगवेगळ्या धर्माचे लोकं भारतीय लष्करामध्ये असून त्यांना देशभक्ती ही केवळच एकच गोष्ट ठाऊक आहे. म्हणजे अगदी माज असो किंवा प्रार्थना असो भारतीय सैन्यदलातील जवान सर्वच धर्मांना समान वागणूक देतात आणि आपआपल्या धर्माचे पालन करताना दिसतात. असाच एक सुंदर फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या एकाच फोटोमध्ये हिंदू आणि मुस्लीम जवान आपआपल्या पद्धतीने धार्मिक प्रार्थना करताना दिसत आहेत.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोला, ‘As received, source classified! Separated by religion; United by Faith’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. म्हणजेच खात्रीलायक सुत्रांकडून हा फोटो मिळाला असून यामधून ‘धर्म वेगवळे असले तरी विश्वास एकच आहे’ असं दिसून येत असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
“ज्यांना ठाऊक नाही त्यांना सांगू इच्छीतो की माझ्या युनिटमधील १५ टक्के जवान मुस्लीम आहेत. येथे प्रत्येक पवित्र गोष्टीची सुरुवात मंदिरामधील पुजेने आणि मशिदीतील नमाज/दुवा सांगून केली जाते. दोन्ही धर्मांची प्रार्थनास्थळे एकाच छप्पराखाली असून त्याला ‘सर्व धर्म स्थळ’ असं नाव देण्यात आलं आहे. जरी आम्ही सध्या कुठे आहोत हे सांगू शकत नसलो तरी माझ्या युनिटमधील या दोन जवानांचा फोटो शेअर करण्याचा मोह मला आवरला नाही. हे दोघेही आपआपल्या पद्धतीने धार्मिक विधी करत असून दोघांमध्ये केवळ एक भिंत आहे,” असं या इन्स्टाग्राम पोस्टसोबत शेअर करण्यात आलेल्या डिस्क्रीप्शनमध्ये लिहिलं आहे.
केवळ इन्स्टाग्रामच नाही तर ‘रेडइट’वरही हा फोटो व्हायरल झाला आहे. “ही आपली एकत्रित ताकद आहे. विविधतेत एकता,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो रेडइटवर शेअर करण्यात आला आहे. “ते दोघे एकाच खोलीमध्ये आहेत. तुम्ही उजवीकडील आणि डावीकडील कार्पेट पाहू शकता सारखंच आहे. या दोघांमध्ये दिसणारा दुभाजक म्हणजे विंडो फ्रेम असून भिंत नाहीय. लोकांना ते वेगळे दिसत असले तरी ते एकत्र नाहीय असा त्याचा अर्थ होत नाही,” अशी कमेंट एका रेडइट युझरने केली आहे.