Charles Sobhraj viral news: नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर बिकिनी किलर या नावाने ओळखला जाणारा सीरियल किलर शोभराज चार्ल्सची (७८) तुरुंगातून सुटका करण्यात आली. १९ वर्षांनंतर शोभराजची सुटका झाल्यानंतर त्याने मायदेशी फ्रान्सला परतण्यासाठी विमानाने प्रवास केला. पण ७० च्या दशकात थैमान घालणारा सीरियल किलर जेव्हा विमानात प्रवासासाठी बसतो, तेव्हा बाजूच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाला काय वाटतं? हे एका व्हायरल झालेल्या फोटोच्या माध्यमातून समोर आलं आहे.
काठमांडूच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर शोभराजच्या प्रवासाच्या कागदपत्रांच्या सोपस्काराची प्रकिया पूर्ण करण्याची जबाबदारी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानंतर शोभराजने कतार ऐअरवेजच्या विमानातून (QR647) पॅरिसला जाण्यासाठी प्रवास केल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. फ्रान्सला जाणाऱ्या विमानात शोभराज ज्या सीटवर बसला होता, तो फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. कारण शोभराजच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या महिलेचा हावभाव बोलके आहेत. शोभराज बाजूला बसल्यानंतर प्रवासी महिलेनं भन्नाट रिअॅक्शन दिल्यानं फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी मिम्स बनवले असून इंटरनेटवर सर्वत्र याच फोटोची चर्चा आहे.
इथे पाहा व्हायरल झालेला फोटो आणि मिम्स
नेपाळमध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला फ्रेंच ‘सीरियल किलर’ चार्ल्स शोभराजची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याला काठमांडूतील विमानतळावरून फ्रान्सला पाठवण्यात आले. ७८ वर्षीय शोभराजची गुरुवारी कारागृहातून सुटका झाली होती. मध्यवर्ती कारागृहातून त्याला सोडण्यात आल्यानंतर त्याच्या प्रवासाच्या कागदपत्राचे सोपस्कार इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पूर्ण केले. सर्वोच्च न्यायालयाने सुटका केल्यानंतर शोभराजला मायदेशी परत पाठवण्याचे आदेश दिले होते. सुटका झाल्यानंतर दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून त्याला मायदेशात पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण केली.