शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! असं म्हणतात. हे गीर सोमनाथमधील अराथिया गावात राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलाला बरोबर समजलं आणि त्याने युक्ती वापरून बिबट्याच्या तावडीतून आपल्या मित्राची सुखरूप सुटका केली. जयराज गोहेल असं या धाडसी मुलाचं नाव असून, त्याने नीलेश नावाच्या मित्राला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवलं.

जयराज आणि नीलेश दोघंही आपल्या घराजवळ खेळत होते. यावेळी झुडूपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने नीलेशवर हल्ला केला. नीलेश प्रतिकार करू शकत नव्हता. बिबट्याने त्याला फरफटत जंगलाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मित्राला वाचवण्यासाठी जयराजनं त्याच्या दिशेने दगड भिरकावले पण यातून काहीच साध्य झालं नाही. शक्तिशाली बिबट्याच्या तावडीतून आपल्या मित्राला वाचवणं अवघड असल्याचं लक्षात येताच छोट्या जयराजनं शक्कल लढवली. त्याने आपल्या हातातलं इलेक्ट्रॉनिक खेळणं बिबट्याच्या दिशेनं फेकलं. खेळण्यातून निघालेल्या कर्कश आवाजाला घाबरून बिबट्याने निलेशला तिथेच सोडलं आणि जंगलात पळ काढला.
जयराजच्या युक्तीमुळे निलेश थोडक्यात बचावला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे निलेशच्या शरीरावर जखमा झाल्या. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गीर सोमनाथ भागात बिबट्यांचा संचार वाढला आहे. त्यामुळे गावकरी दहशतीखाली आहेत.

Viral Video : पाहा, ‘डायनोसॉर’ जोडप्याचं लग्न