Trafficking Survivor Video: सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक कटेंट क्रिएटर व्हिडीओ शेअर करत असतात. अनीश भगत हा कटेंट क्रिएटर त्याच्या वेगळ्या आणि हटके व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. मानवी दुःख आणि संघर्षाच्या कथा लोकांसमोर मांडण्यात तो पटाईत आहे. नुकतीच त्याने मानवी तस्करीतून सुटलेल्या एका महिलेची व्यथा व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. पंधरा वर्षांनंतर ही महिला वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून सुटली आणि आपल्या कुटुंबियांकडे गेली. तिथे गेल्यावर काय झाले? हे अनिश भगतने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवले.

अनिश भगतने शेअर केलेल्या रिलच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. एका वेदनादायी कथेचा मी साक्षीदार झालो. पंधरा वर्षांपूर्वी एका मुलीबरोबर अन्याय झाला. ती आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. लहानपणी वेश्याव्यवसायात बळजबरीने ढकलली गेल्यानंतर १५ वर्षांनी ती घरी पोहोचली. तिला वाटले आता तिला स्वीकारले जाईल. मात्र समाजाच्या दबावाखाली तिच्या घरच्यांनी तिला स्वीकारले नाही.

“लहानपणी तिला नरकात ढकलले गेले. तिच्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही गोष्टी अशा असतात ज्यात दुःखाचा कधी अंतच होत नाही”, अशी माहिती अनिश भगत या व्हिडीओद्वारे देतो.

व्हिडीओच्या सुरुवातीला संबंधित महिला तिच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त करताना दिसते. ती म्हणते, “मी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबाला भेटलेली नाही. मला त्यांना पुन्हा भेटायचे आहे. मी आता वेश्याव्यवसायातून बाहेर आले आहे. ते मला स्वीकारतील.” यापुढे जाऊन ती सांगते, काही वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले. तिची आई गृहिणी आहे. तिच्या आईला साड्या आवडतात. म्हणून घरी जाण्यापूर्वी तिने आईसाठी साडी घेतली. मोठ्या भावासाठी घड्याळ घेतले.

अनिश भगत सांगतो की, ती तिच्या घरी गेल्यानंतर आता ती बाहेर येऊन मला काय सांगते. याची उत्सुकता लागली होती. पण ती रडत रडत बाहेर आलेली पाहून मला धक्का बसला. ती म्हणाली, आमच्यासारख्या महिलांबरोबर हेच होतं. अनेकजणी घरी जातात आणि त्यांना घरातले स्वीकारत नाहीत. तिने कुटुंबासाठी एक पत्र लिहिले आणि आणलेल्या भेटवस्तूंबरोबर ते घराच्या बाहेर ठेवले आणि ती मागे फिरली.

अनिश भगतचा या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. व्हिडीओत दाखविल्या गेलेल्या महिलेबाबत अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली. तसेच तिच्या काकाला तुरुंगात टाकण्याची मागणी केली. एका युजरने लिहिले की, तिच्या काकाला तुरुंगात धाडले पाहिजे. यात तिची काहीही चूक नाही.

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हा असा आपला समाज आहे. ज्याने चूक केली, त्या काकाला दोष देण्याऐवजी जी पीडिता आहे, तिला छळले जात आहे.