हल्ली सोशल मीडियाच्या युगात मजकूर पाठवण्यापेक्षा चित्रमय संभाषणालाच अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे चॅट करत असताना आपल्या चेहऱ्यावर किंवा मनात उमटलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण शब्दांऐवजी आता इमोजीचा आधार घेतो. परंतु या वापरावर आता काहीशा मर्यादा येणार आहेत. कारण फेसबुकने ‘वांगे’ आणि ‘पीच’ या दोन इमोजींवर बंदी घातली आहे. या बंदीमुळे फेसबुक व इन्स्टाग्रामवर चॅट करताना आता आपल्याला यापुढे या दोन इमोजींचा वापर करता येणार नाही.
“गेल्या काही काळात ‘वांगे’ आणि ‘पीच’ या दोन इमोजींचा वापर खुप मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. विशेषत: या इमोजींचा वापर अश्लील संभाषण करण्यासाठी केला जातो. अश्लील संभाषण व संबंधित सामग्रीवर निर्बंध यावेत यासाठी फेसबुकने या दोन इमोजींना काढून टाकले आहे. येत्या काळात अशाच प्रकारच्या आणखी काही इमोजींना काढून टाकण्यात येईल” असे स्पष्टीकरण फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यांनी दिले आहे. अर्थात त्यांच्या या नव्या निर्णयावर फेसबुक वापरकर्ते मात्र फारसे खुश नाहीत.
फेसबुकच्या सुरक्षा यंत्रणेवर गेल्या काही काळात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांनी त्यांची अकाऊंट हॅक झाल्याच्या तक्रारी केल्या. तसेच विविध देशांच्या निवडणुकींमध्ये फेसबुकचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो असे आरोप फेसबुकवर केले गेले. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी व आपली सुरक्षा यंत्रणा आणखी प्रबळ करण्यासाठी फेसबुकने आपल्या नियमावलीत काही तांत्रिक बदल केले. या बदलांमुळेच ‘वांगे’ आणि ‘पीच’ या दोन इमोजींना काढून टाकले गेले. असे मत सोशल मीडिया तज्ञांनी व्यक्त केले आहे.