बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची क्रेझ चाहत्यांसह अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याचे फॅन्स खूपच उत्साहित आहेत. यामुळे फॅन्स वेगवेगळ्या पद्धतीने शाहरुखवर प्रेम व्यक्त करत आहेत. अशात चित्रपटाच्या तिकिटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अनेक चाहत्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. शाहरुखचा जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यामुळे ‘जवान’चा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्यासाठी एका पठ्ठ्याने अख्खं थिएटर बुक केलं आहे. सोशल मीडियावर या चाहत्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
जवानचे असे दमदार बुकिंग होत असताना या चाहत्याने अख्खं थिएटर बुक करून शाहरुखवरील त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे तो त्याच्या ३६ गर्लफ्रेंड, ७२ एक्स-गर्लफ्रेंड आणि ८० मित्र मैत्रिणींबरोबर हा चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे शाहरुखचा हा जबरा फॅन चर्चेचा विषय ठरत आहे.
ट्विटरवर vedant नावाच्या एका अकाउंटवरून शाहरुखच्या जबरा फॅनचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात त्याने जवान चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे. या व्यक्तीने ट्विटरवर स्वत:चा जवान चित्रपटाच्या बुकिंग तिकिटांनी झाकलेला एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्याने अलीकडेच ‘जवान’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे. तो त्याच्या ३६ गर्लफ्रेंड, ७२ एक्स-गर्लफ्रेंड आणि ८० मित्र-मैत्रिणींबरोबर हा चित्रपट पाहणार आहे. या पोस्टमध्ये त्याने शाहरुख खानलाही टॅग केले आहे.
शाहरुखने चाहत्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर तो आपली प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहू शकला नाही. चाहत्याची पोस्ट रिपोस्ट करत शाहरुखने लिहिले की, ‘वाह भावा, तुझे तारुण्य चमकून येत आहे. हा हा ऐश कर…
यावर अनेक युजर्सनी आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘थिएटरमध्ये खूप दंगा होणार आहे. जेव्हा सर्व ३६ मैत्रिणी आमनेसामने येतील, तेव्हा जवान चित्रपट सुरू होण्यापूर्वीच त्यांची कॅट फाईट सुरू होईल; तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “हाहाहा, खरा जवान तर हा व्यक्ती आहे. याशिवाय तिसऱ्या एकाने लिहिले की, या भावाने चित्रपट हिट करूनच शांत राहणार असा ठेका घेतल्याचे दिसतेय.
अँटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ हा बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘पठाण’नंतर शाहरुख खान पुन्हा एकदा जवान चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर आग लावण्यास येत आहे. दरम्यान, ‘जवान’ची ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच रेकॉर्ड ब्रेक कमाई होत आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा ही तगडी स्टारकास्ट दिसणार आहे; तर दीपिका पादुकोण आणि संजय दत्त खास कॅमिओमध्ये दिसणार आहेत.