कोरोना काळात सोशल मीडियावर एका ८५ वर्षांच्या वॉरियर आजींचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. शांताबाई पवार, असे या आजींचे नाव. पारंपरिक लाठी-काठी खेळ सादर करणाऱ्या आजींची कला पाहून सर्वच जण तेव्हा थक्क झाले होते. पण, कोरोना काळात त्यांच्या उपजीविकेवर गदा आली. मिळालेल्या तेवढ्या तुटपुंज्या कमाईवर त्या घर चालवत. कोणीतरी त्यांच्या कलाकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी आजींसाठी मदतीचा हात पुढे केला होता; ज्यांचे आभार त्या आजही मानतात. सध्या या आजींचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्याच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये एक पाय फ्रॅक्चर असताना या वॉरियर आजी लाठी -काठी खेळ सादर करीत आहेत. वॉकरच्या मदतीने चालत असूनही त्या उत्तम प्रकारे खेळ सादर करीत आहेत. हा व्हिडीओ ट्रेंडिंग पुणे आणि तुषार चव्हान यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, ”लोककलाकार आजी – अनाथांची आजी – वॉरियर आजी. सध्या, खराडी येथे झेन्सर टेक्नॉलॉजी परिसरात या आजी लाठी-काठी कला सादर करताना तुम्हाला दिसतील. कृपया तिथे जा आणि त्यांना भेट द्या, त्यांची कला पाहा आणि या ८७ वर्षीय महिलेला पाठिंबा द्या; जी तिच्या सात दत्तक मुलांना खाऊ घालण्यासाठी आणि शिकवण्यासाठी हे सर्व करीत आहे. ती भिकारी नाही; ती एक स्ट्रीट आर्टिस्ट आहे. तिला खूप प्रेम द्या ”

त्यांनी कॅप्शनमध्ये पुढे लिहिले आहे, ”कलाकार (@shantapawar085) शांताबाई पवार यांना भेटा. या आजी या ८७ वर्षीय स्ट्रीट परफॉर्मर आणि मार्शल आर्ट ट्रेनर आहेत. पुण्यात त्यांच्या सात सदस्यांच्या कुटुंबातील त्या एकमेव कमावत्या आहेत. त्या वयाच्या आठव्या वर्षापासून लाठी-काठी कला सादर करीत आहेत आणि आपले कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या अदभुत प्रतिभेमुळे त्यांच्या सात सदस्यीय कुटुंबाचे पोट भरते. त्यांनी परिसरातील अनेक मुलांना मार्शल आर्ट आणि स्वसंरक्षण शिकवण्यासाठी एक अकादमीही स्थापन केली आहे. त्यांच्या कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही शाळा २०२० मध्ये अस्तित्वात आली होती.”

हेही वाचा – ”आमच्या पप्पांनी गणपती आणला” फेम चिमुकला आहे तरी कोण? रातोरात झाला स्टार; नवा व्हिडीओ व्हायरल

वयाच्या ८७ व्या वर्षीदेखील या आजी कुटुंबासाठी कष्ट करीत आहेत. स्वत: पारंपरिक कला जोपासत आहेत; पण इतरांनादेखील प्रशिक्षण देऊन कलेचा वारसा पुढे चालू ठेवत आहेत. पण त्यांच्यासमोरील आर्थिक संकट मात्र संपत नाही. करोना काळात त्यांना मिळालेली मदत ही तात्पुरती होती त्यामुळे पुन्हा कुटुंबासाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागले.

हेही वाचा – चालत्या Mahindra XUV700 कारमध्ये चक्क ड्रायव्हरच बसला मागच्या सीटवर; धक्कादायक VIDEO व्हिडीओ होतोय व्हायरल

करोना काळात त्यांना अनेकांनी मदत केली. अगदी बॉलीवूड अभिनेता सोनू सूदपासून रितेश देशमुखपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मदत केली; ज्याची आठवण शांताबाईंना अजून आहे. या पैशांमधून आजींबाईचे आधीचे कर्ज फिटले, घराचे अर्धे कामही झाले; पण कुटुंबाचे पोट मात्र भरेना. त्यामुळे नाइलाजाने त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून काठी हाती घ्यावी लागत आहे. सध्या त्यांचा पाय फ्रॅक्चर असूनही त्या कुटुंबासाठी पुन्हा जिद्दीने उभ्या राहिल्या आहेत. आजीबाईंची ही चिकाटी अनेकांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shantabai pawar warrior grandmother performs lathi kathi game even while having a leg fracture the video is going viral snk