Artificial intelligence : सध्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कमाल आता सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. AI च्या माध्यमातून विविध कामे सहज करता येत आहेत. ‘एआय’ वापरून भविष्यातील प्रत्येक क्षेत्र विकसित केले जाऊ शकते. त्याचा फायदाही होताना दिसत आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. आता यामध्ये महाराष्ट्राच्या नेत्यांच्या एआय फोटोंची भर पडली आहे.
आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही दिवंगत नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचेही एआय फोटो आहेत. सध्या सोशल मीडियावर हे एआय फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे ज्या नेत्यांची डिस्ने कार्टून अमित वानखेडे यांनी तयार केली आहेत, त्यांपैकी काहींनी आभार मानले आहेत. AI च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या फोटोंचे त्यांनी कौतुक केले आहे.
या दिवंगत नेत्यांचे साकारले एआय फोटो
अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील काही दिवंगत नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, आर. आर. पाटील राजीव सातव, गिरीश बापट, विनायक मेटे यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या या दिग्गज नेत्यांचे साकारले एआय फोटो
अमित वानखेडे यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे एआय फोटो बनवले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
जयंत पाटील यांच्यासह वळसे पाटील यांनीही मानले अमित वानखेडे यांचे आभार
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अमित वानखेडे यांचे आभार मानले आहेत. ”अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार! पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनीयर म्हणून बघायला आवडेल. कारण- इंजिनीयर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे.” असे ट्विट करून जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.
.
दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ”आर्टिस्ट अमित वानखेडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने अर्कचित्र साकारल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! आपल्या कलेला अधिक प्रोत्साहन मिळून उत्तमोत्तम कलाकृती आपल्या हातून घडोत ही सदिच्छा!”