Shark Tank Judges Fraud Accusations: शार्क टॅंक इंडियाचा दुसरा सीझन सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चेत राहिला. अनेक उद्योजकांना शार्क टॅंकमधून गुंतवणुकीच्या रूपात मदतीचा हात देण्यात आला. पण आता हाच मदतीचा हात फसवा असल्याची टीका शार्क्सवर केली जात आहे. शार्क टॅंक मधील पॅनलवरील मान्यवरांवर फसवणुकीचा आरोप लगावण्यात आला आहे. iWebTechno चे संस्थापक आणि शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमधील स्पर्धक अक्षय शाह यांच्या अलीकडील ट्विटमध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. अक्षय यांच्या ट्विटनुसार, शोमधील दोन परीक्षकांनी गुंतवणुकीचे आश्वासन दिले होते परंतु त्यानंतर त्यांची वागणूक बदलली.
अक्षय सांगतात की त्यांना कोणत्याही गुंतवणुकीचे पैसे दिले नाहीत. शो संपल्यानंतर, शार्क कधीही भेटले नाहीत किंवा त्यांच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद दिला नाही. यावेळी नेटकऱ्यांनी उलटतपासणी करत शार्कचे नाव घेऊन त्यांना थेट प्रश्न का करत नाही असे विचारले ज्यावर अक्षय यांनी उत्तर देत आपल्याला भीती वाटत असल्याची कबुली दिली. “सीझन 1 मध्ये आम्ही ज्या गोष्टींचा सामना केला, तसाच अनुभव शोमध्ये सहभागी झालेल्या ५०% पेक्षा जास्त उद्योजकांना सुद्धा आला. परंतु कोणताही उद्योजक उघडपणे समोर आला नाही.” या भीतीचा शार्क टॅंकमधील परीक्षक गैरफायदा घेत असल्याचे अक्षय यांनी म्हंटले आहे.
अक्षयच्या ट्विटमुळे या शोचे वास्तव आणि त्यातील स्पर्धकांच्या अनुभवांबद्दल चर्चेला उधाण आले आहे. काही ट्विटर वापरकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले की प्रत्येक उद्योजकाला निधी मिळत नाही. यावर पुन्हा उत्तर देत अक्षय यांनी फंडिंग नाकारणे व करार झाल्यानंतर प्रतिसाद न देणे या दोन भिन्न गोष्टी आहेत असे स्पष्ट केले.
शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनमध्ये अनुपम मित्तल, अमन गुप्ता, नमिता थापर, विनीता सिंग, पीयूष बन्सल आणि अमित जैन यांच्यासह सहा नवीन परीक्षक आहेत.