गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद होण्याच्या दृष्टीने भारतीयांसाठी हे वर्ष चांगले गेले. गुजरातच्या एका ब्युटीशियनची नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. शीतल कल्पेश शाह या महिलेनी एका दिवसात सर्वाधिक हेअर कट करण्याचा एक नवा विक्रम रचला आहे.
२४ तासात तिने ५७१ जणांचे हेअर कट केले आहेत. तिच्या या विक्रमाची दखल गिनीज बुकने घेतली. शीतलने १० डिसेंबर रोजी तब्बल ५७१ जणांचे केस कापले. सकाळी ९.१५ वाजता त्यांनी केस कापण्यास सुरुवात केली आणि ११ डिसेंबर रोजी ९.१५ पर्यंत त्यांनी ५७१ जणांचे केस कापले.
आपल्या पतीसोबत बोलत असताना ही कल्पना सुचली आणि आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी या गोष्टीसाठी परवानगी दिली आणि त्यानंतर आम्ही सर्व सोय करुन हा विक्रम स्थापित केल्याचे शीतल यांनी एएनआयला म्हटले.
माझ्या या विक्रमासाठी ब्युटी पार्लरमधील स्टाफने सहकार्य केले तसेच लोकांनी देखील मोलाचे सहकार्य केल्याचे त्या म्हणाल्या. मला नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची हौस होती. त्यातूनच हा विक्रम करावा असे मला वाटले. महिलांनी आपल्या कुटुंबासाठी तर करावेच परंतु आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्यामध्ये काही काम करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
मला वाटते जर महिला या घराबाहेर पडल्या आणि त्यांनी काम केले तर त्या त्यांची स्वप्नेही पूर्ण करू शकतील. असा संदेश त्यांनी महिलांना यावेळी दिला. याआधी हा रेकॉर्ड लंडनमधील एका दाम्पत्याच्या नावावर होता. त्यांनी २४ तासांमध्ये ५२१ हेअर कट करुन हा विक्रम रचला होता.
या वर्षात भारतात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड बनले आहेत. चेन्नईमध्ये झालेल्या वर्ल्ड योगा फेस्टिवलमध्ये सर्वाधिक लोकांनी एकत्र शीर्षासन करण्याचा एक रेकॉर्ड बनवला. तर जॅकलिन फर्नांडिस, कल्की कोचलीन या सेलिब्रिटींनी एकत्र येऊन सर्वाधिक जास्त महिलांनी एकावेळी अॅबडॉमिनल प्लांक करण्याचा रेकॉर्ड बनवला होता.