कचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जाते.
आता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. गरमागरम कचोरीसोबत मिरची, शेव आंबट चटणी किंवा तिखट हिरवी चटणी दिली जाते. आता या पारंपरिक कचोरीसोबतच अनेक ठिकाणी सँडविच, मिक्स व्हेज कचोरी, स्पेशल जैन कचोरी, चीज कचोरीदेखील मिळते. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते. ही कचोरी सामान्य तापमानाला ३ दिवस तर फ्रीजमध्ये ३ महिन्यांपर्यंत टिकते असे शर्मा यांनी सांगितले.