केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे आणि चिन्हाचे वाटप केले. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले आहे. तर शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर शिंदे गटाने दिलेले चिन्हाचे तिन्ही पर्याय नाकारण्यात आले असून आज सकाळी दहा वाजेपर्यंत अन्य तीन पर्याय देण्यास सांगण्यात आलं आहे. असं असतानाच ठाकरे गटाने मात्र मशाल चिन्हावरुन सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवातही केली आहे. मात्र शिवसेना पहिल्यांदाच मशाल हे चिन्ह घेऊन लढत नाही. यापूर्वी शिवसेनेचे माजी नेते आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनीही आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात या चिन्हावर निवडणूक लढली आणि जिंकली होती. आता या निवडणुकीच्या प्रचारासाठी छापलेल्या जाहिरातींची जुनी कात्रण सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर याआधी १९८५ मध्ये शिवसेनेचे छगन भुजबळ हे एकमेव आमदार निवडून आले होते. हा शिवसेनेचा ऐतिहासिक विजय होता. त्यावेळी शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष नसल्याने पक्षाच्या उमेदवारांना विविध चिन्हे निवडावी लागत होती. त्यानुसार भुजबळ यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते. शिवसेनेच्या वतीने निवडून आले तरी शिवसेना पक्ष नोंदणीकृत नसल्याने त्यांची गणना अपक्ष आमदार म्हणूनच होत असे.

नक्की वाचा >> शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यासंदर्भात विचारलं असता रितेश देशमुख म्हणाला, “येणाऱ्या काळात जे घडणार आहे त्यावरुन आपल्याला…”

हाच निवडणुकीसाठी छापण्यात आलेली जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या जाहिरातीमध्ये माझगावं विधानसभा मतदारसंघ असं वर लिहिण्यात आलं असून त्या खाली हात जोडून उभे असणारे छगन भुजबळ आणि बाजूला मशाल हे निवडणूक चिन्ह दिसत आहे. शिवसेनेचे झुंजार नेते असा छगन भुजबळ यांचा उल्लेख या पत्रकात आहे. भुजबळ यांनी जनतेनं या निवडणुकीमध्ये आपल्याच मतदान करावे असं आवाहन केलं आहे.

नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

…म्हणून सहापैकी केवळ मशालच पास
ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, आता ते खुले करण्यात आले आहे. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते.

नक्की वाचा >> “मलाच CM व्हायचं आहे इथंपर्यंत…”, “आता अती होतंय…”, “तेव्हाही त्रास झालाच पण…”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाला वापरता येईल. शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ तसेच, ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, ‘गदा’ या चिन्हालाही धार्मिक संदर्भ असल्याने आयोगाने हे चिन्ह नाकारले. धार्मिक संदर्भ असलेली चिन्हे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे म्हणून न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena and mashal in 1985 chhagan bhujbal fought on burning flame symbol wins to become first mla scsg
Show comments