राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या प्राचाराने जोर पडकला आहे. शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा करत जागावाटप जाहीर केले. जागा वाटपामध्ये शिवसेनेने १२४ जागांवर समाधान मानत भाजपासाठी १६४ जागा सोडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथून सर्व उमेदवार हे भाजपाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेने अगदीच मवाळ भूमिका घेतल्याची टीका सोशल नेटवर्किंगवरुन केली जात आहे. एकीकडे राजकीय तज्ज्ञ शिवसेनेवर टीका करत असतानाच दुसरीकडे ट्रोलर्सनेही शिवसेनेने मोठा भाऊ म्हणत छोटा वाटा घेतल्याबद्दल सेनेला टार्गेट केले आहे. शिवसेना-भाजपामध्ये जागावाटप कसे झाले यासंदर्भातील व्हिडिओ म्हणून अभिनेता अक्षय कुमारचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी युतीच्या जागावाटपाचे अक्षय कुमार कनेक्शन शोधून काढल्यानंतर ते खूपच व्हायरल झाले आहे.
२०१४ मध्ये शिवसेनेने १५१ जागांवर लढण्याची अटक घालत भाजपासाठी १२७ जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेरपर्यंत शिवसेना भाजपामधील जागावाटपाचा तिढा सुटला नाही आणि दोन्ही पक्षांनी संयुक्तरित्या निवडणूक लढवली होती. यावेळीही जागावाटपावरुन बरीच चर्चा झाल्यानंतर शिवसेनेने एक पाऊल मागे जात १२४ जागांवर समाधान मानले. स्वत:ला मोठा भाऊ म्हणवणाऱ्या शिवसेनेने मवाळ भूमिका घेतल्याने अनेक ठिकाणी युतीचा उमेदवार म्हणून भाजपाच्या उमेदावराला संधी देण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. ही नाराजी आणि शिवसेनेने घेतलेली नमती भूमिका यावर सोशल नेटवर्किंगवर चर्चांना उधाण आले आहे. गंभीर टीका, मिम्स, व्हायरल व्हिडिओच्या माध्यामातून अनेकजण या युतीबद्दल मत व्यक्त करताना दिसत आहेत. असाच एक युतीवर भाष्य करणार व्हिडिओ म्हणून अक्षय कुमारच्या ‘दिवाने हुवे पागल’ सिनेमातील एक सीन व्हायरल झाला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये
व्हायरल झालेल्या सीनमध्ये अक्षय कुमार बॉक्सिंगमध्ये जिंकलेले पैसे वाटप करताना दिसत आहे. यात तो आपल्या साथीदाराबरोबर पैसे वाटप करताना कशाप्रकारे अक्कल हुशारीने स्वत: जास्त पैसे घेतो हे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये अक्षय स्वत: नोटांचे एक बंडल ठेवतो, सहकाऱ्याला एक बंडल देतो. नंतर ‘हे माझे दोन बंडल’ म्हणत स्वत:कडे दोन बंडल ठेवतो. त्याच वेळी सहकाऱ्याला मात्र दुसऱ्यांदाही एकच बंडल देत ‘आधीचा एक आणि हा एक असे तुझे दोन’ असं म्हणतो. खरं तर अक्षयकडे आधीचा एक आणि नंतर घेतलेले दोन असे नोटांचे एकूण तीन बंडल असतात तर सहकाऱ्याकडे दोनच बंडल असतात. असं करत करत तीन वेळा वाटप करुन अक्षय स्वत:कडे नोटांचे सहा (१+२+३) बंडल घेतो तर समोरच्याला तीनच बंडल देतो. अक्षय कुमार हा भाजपा असून समोरचा सहकारी म्हणजे शिवसेना आहे, अन् नोटा म्हणजे मतदारसंघ आहेत असं सांगत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. काही तासांमध्ये हा व्हिडिओ चार हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ
दरम्यान, जागा वाटपामुळे अनेक मतदारसंघ मित्रपक्षाच्या वाट्याला गेल्याने संबंधित मतदारसंघातील अनेक इच्छूक नाराज झाले असून ते बंड करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पक्षांतर्गत बंड शांत करण्याचे मोठे आव्हान पक्षांच्या नेत्यांसमोर आहे.