Accident Video : सोशल मीडियावर अपघातांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर खरंच खूप भीती वाटते. काहींच्या मनात तर रस्त्यावरून वाहन चालवतानाही आपण सुरक्षितरीत्या इच्छित स्थळी पोहोचू की नाही याबाबतचे विचार सतत सुरू असतात. अनेकदा चालकाला निष्कारणच त्याला समोरच्या वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघाताला बळी ठरावे लागते. त्यामुळे कितीही ठरवून सुरक्षित वाहन चालवले तरी कधी कधी अपघात टाळणे कठीण होते. परंतु, आता सोशल मीडियावर अपघाताचा एक अत्यंत भीतीदायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. या अपघाताच्या घटनेत नेमके काय घडले? नेमकी चूक कुणाची होती याबाबत आपण जाणून घेऊ…
ट्रकचालकाच्या चुकीमुळे एका कुटुंबाचा जीव कसा धोक्यात आला, पाहाच
अपघाताची घटना कधी, कुठे घडेल ते काही सांगता येत नाही. तरी वाहनचालकांना सावधपणे वाहन चालवण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. त्यात काही दुर्घटनांमध्ये थोडक्यात मोठी दुर्घटना होता होता टळते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो ट्रकचालकाच्या चुकीमुळे एका कुटुंबाचा जीव कसा धोक्यात आला ते दाखवून देतोय.
अपघातातून कुटुंबाचा थोडक्यात बचावला जीव
धक्कादायक अपघाताचा हा व्हिडीओ इंग्लंडमधील नॉर्थ वेल्सजवळील बांगोर या ठिकाणचा आहे. त्यात एक ट्रकचालक गाडी चालवताना त्याच्या फोनवर पॉडकास्ट सर्च करीत होता. त्यावेळी मोबाईलवर त्याला हवे ते शोधण्यात तो इतका गुंग झाला की, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कारवर जाऊन जोरात धडकला. त्यानंतर ट्रक महामार्गावरून गेला आणि पुढे तो थेट झुडपात जाऊन पडला. मात्र यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारममधील कुटुंब खाली उतरून रस्त्याच्या कडेला उभे होते. ते कुटुंब त्यांच्या कारमधून बाहेर पडल्यामुळेच या अपघातातून थोडक्यात वाचले. यावेळी डॅशकॅम फुटेजमध्ये चालकाचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. या अपघाताचा एक लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे.
ट्रक चालकाला झाली ‘ही’ शिक्षा
‘द सन’च्या वृत्तानुसार, ४४ वर्षीय रेमंड कॅट्रल या चालकाने कबूल केले की, त्याच्या धोकादायक ड्रायव्हिंगमुळेच अपघात घडला. या घटनेसाठी त्याला आठ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. तसेच त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. कॅट्रलला आता पुन्हा परवाना मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण व्हावे लागेल. त्याशिवाय त्याला १५० तास पगाराशिवाय काम करावे लागेल आणि तीन महिने संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत गाडी चालवण्यास परवानगी नसेल.अशा निष्काळजीपणासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी.
या घटनेबाबत सोशल मीडियावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मात्र चालकाचा परवाना कायमचा निलंबित करून, अशा निष्काळजीपणासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी, असे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी कुटुंबाने आपली गाडी रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे उभी करणे चुकीचे होते, असेही काहींनी म्हटले आहे.