Shocking Accident Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ फारच भयानक आणि धडकी भरवणारे असतात, जे पाहून अनेकदा गाडीचालकासह प्रवाशांच्या मनातही आपण सुरक्षित स्थळी पोहोचू की नाही याबाबतचे जीवाची चिंता करणारे विचार सुरू असतात. अनेकदा चालकांच्या, तर काही वेळा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना घडतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कारचा दरवाजा उघडा राहिल्यानंतर प्रवाशाबरोबर काय घडू शकते याचे भयानक दृश्य दिसतेय.
या घटनेनंतर कारमध्ये बसल्यानंतर दरवाजा नीट बंद करणे का महत्त्वाचे असते आणि तसे न केल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात हे स्पष्टपणे दिसतेय. व्हिडीओत आपण पाहू शकता की, एक कार उतरणीच्या रस्त्यावरून धावताना दिसतेय. याचवेळी अचानक कारमधून एक महिला जोरात खाली कोसळते. ज्या कारमधून महिला खाली कोसळते, ती कार काही अंतरावर जाऊन थांबते. यावेळी समजते की, कारचा दरवाजा उघडा राहिल्याने महिला त्या धावत्या वाहनातून खाली कोसळली. कारमधून महिला खाली कोसळताच मागच्या वाहनातील एक व्यक्ती तिच्या दिशेने धावत येते. त्यानंतर ती व्यक्ती त्या महिलेला उठवून, त्यांच्या वाहनात बसण्यासाठी घेऊन जाते. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ मागून येणाऱ्या एका कारमधील व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
“नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली”
सुदैवाने अपघात झाला त्यावेळी मागून कोणतेही भरधाव वाहन आले नाही; अन्यथा दुर्दैवी घटना घडली असती. या अपघाताचा व्हिडीओ @nebresultandnews0 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेक जण विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले की, ही एक धक्कादायक बाब आहे. गाडीमध्ये बसल्यानंतर नेहमी दरवाजा बंद आहे की नाही तपासा. काहींनी म्हटले की, नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली.